भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां ऐका कवित कबीरा । राम सेवेसी तत्परा

atan aika kavit kabira | ram sevesi tatpara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आतां ऐका कवित कबीरा । राम सेवेसी तत्परा । संत साधु आलिया घरा । कदा पाठमोरा नव्हेची ॥१॥ कोणी एके अवसरीं । आहे जी माध्यान रात्रीं । मिळोनि संतमांदी बरी । आले घरीं कबीराचे ॥२॥ तंव स्त्रीसहित उठोनी । लागे संतांचे चरणीं । आमुचें परम भाग्य म्हणोनी । जाली भेटी स्वामींची ॥३॥ मोडकें खोपट जर्जर । तेथें कैंचें भिंती आवार । वरुविण उपवासी पोर । नांदणुक थोर कबीराची ॥४॥ तंव बैसावया । कारण । संतांसी घातलें आसन । काढिला बोर्‍या मुलें उठवून । सवेंचि आपण उभा ठेला ॥५॥ कबीर म्हणे स्त्रियेसी । कांहीं नैवेद्य करावा देवासी । अवश्य म्हणोनी त्वरेसी । अंगिकारिती पैं जाली ॥६॥ बहुत संकट षडलें नारी । पाहातां धन न दिसे घरीं । दोन प्रहर लोटली रात्री। बाजारीं कोणी असेना ॥७॥ मेघ वर्षती दारुण । काळोखी पडली अति कठीण । अंतरीं स्मरे राम राम निधान । मग झडकरी जाण निघाली ॥८॥ सत्वर येउनी वाणिया आळीसी । तंव कुलुपें जालीं दुकानांसी । कोणी न बोलती कोणासी । जन निद्रेसी प्रवर्तले ॥९॥ मग झाली ह्रदयीं चिंताक्रांत । नामस्मरण करीत । एका दुकाना आंत । काय म्हणत परियसा ॥१०॥ मग जाउनी दुकानाजवळी । उघडी होती एक फळी । वाणी जागत तये वेळीं । अकस्मात बाळी तेथें आली ॥११॥ वाणी पुसे तूं कवणाची कवण । कां आलीस रात्न करून । कवण कृत्य असे तें निरोपण । श्रुत करणें आम्हालागीं ॥१२॥ ऐकें वाणीया देऊनि चित्त । कबीर जाणिजे माझा कांत । घरीं पाहुणे आले साधुसंत । म्हणोनि त्वरित पाठवीलें ॥१३॥ पाहिजे सामुग्री आम्हांसी । विलंब न करावा द्यावयासी । लेख होईल ते आम्हांसी । तंव दुकानासी नेलें तें ॥१४॥ तंव तो नष्ट दुराचारी । जाला असे कामातुर भारी । कुवासना धरिली अंतरीं । म्हणे ऐक सुंदरी वचन माझें ॥१५॥ जें सांगेन तें अंगिकारावें । मग लागेल तितुकें न्यावें । मनीं कांहीं न धरावें । नाहीं तरी जावें आले वाटे ॥१६॥ तंव ते सत्त्वधैर्याची पेटी । देखुनी त्याची चंचळ द्दष्टी । मग म्हणे बरवेंगा सेटी । वेगीं उठीं देईं सर्वदा ॥१७॥ आधीं सामग्री देईं आम्हांसी । कार्य संपादून येईन त्वरेसी । हें बोलणें माझें सत्य परियेसीं । या वचनासी नटळें गा ॥१८॥ तंव तो अविश्वासी नर । तयास कैसा बुद्धि विचार । म्हणे मज भाक देईं वो सत्वर । तरीच खरें वाटे गे आम्हलागीं ॥१९॥ मग भाक देऊनियां नारी । सर्व सामग्री घेतली पदरीं । तेथून निघाली झडकरी । आली घरीं तात्काळ ॥२०॥ मग उभय वर्ग मिळून । केलें संतचरण क्षाळण । घेतलीं तीर्थें समाधान । पूजाविधान आरंभिलें ॥२१॥ केल्या गंधाक्षता समस्तांसी । धूप दीप ओंवाळिले संतांसी । झाला नैवेद्य अवघियासी । मग नमस्कारासी प्रवर्तले ॥२२॥ केले नमस्कार एकंदर । मनीं आनंदला कबीर । म्हणे धन्य भाग्य आजी थोर । करून नमस्कार प्रवर्तले ॥२३॥ सर्व सांग विधि झाली । आनंदाची घडी लोटली । संतवृंदें संतोषलीं । समाधिस्थ झालीं सुखें ॥२४॥ ऐसा संत सत्कार सांभाळिला । मग कबीर स्त्रियेनें खुणविला । आतां पाहिजे निरोप दिधला । शब्द गुंतला आजी माझा ॥२५॥ तुम्ही आसीजे संतांपासीं । मज सत्य करणें वचनासी । भाक देऊनियां वाणीयासी । सामुग्रीसी आणिलें ॥२६॥ त्याचे मनोरथ पूर्ण करणें । म्हणोनि लागे मज जाणें । उशीर होतां उगवेल दिन । शिणतील नयन वाणीयाचे ॥२७॥ कबीर म्हणे वो कांते । मी येईन तुज संगातें । मेघ वर्षती अपरमित । निशी बहुत झाली असे ॥२८॥ त्या वणीयाचा उपकार । आम्हांवरी झाला थोर । मग स्कंधीं वाहोन सुंदर । वेगें सत्वर निघाला ॥२९॥ उभयतां करताती स्मरण । ह्रदयीं आठविला रघुनंदन । घरीं समाचार न घेतां जाण । कोपती सज्जन आम्हांवरी ॥३०॥ मग येऊनि दुकानापाशीं । आणोनि सोडिलें स्त्रियेसी । म्हणे सत्य करावें भाकेसी । वाणीयासी सुख द्यावें ॥३१॥ वाणी पाहत होता वाट । म्हणे रात्रीं येऊनियां धीट । कैसी ठकून गेली नष्ट । तंव अवचट आली पुढें ॥३२॥ मग हर्ष झाला वाणीयासी । भीतरीं येईं वो गुणरासी । तंव आशंका झाली मानसीं । नवल तुजपासीं दिसतसे ॥३३॥ बैसली स्वस्थानीं दोघेंजणें । उपरी आरंभिलें बोलणें । कोरडी आलीस कवण्या गुणें । मृत्तिका चरणीं न लागेची ॥३४॥ वरुनी वर्षताती मेघ । जाला कर्दम वाहाती वोघ । कैसें कौतुक झालें तें सांग । आतां वेगें करुनियां ॥३५॥ ऐक गा सेटीया धर्मवंता । बोलती झाली गा कबीर कांता । तुझा उपकार नये सांगतां । साधुसंतां तृप्त केलें ॥३६॥ झालें संतसमाधान । हें तंव तुझेंचि पुण्य । मी नव्हे उपकारा उत्तीर्ण । सत्त्वरक्षण तुझेनी ॥३७॥ कबीर जीवाचा जिवलग । मज स्कंदीं वाहुनीं चांग । वरुनी झांकिलें सर्वांग । आणीले वेगें तुज पाशीं ॥३८॥ आपण गेले हो त्वरित । घरीं एकले साधुसंत । आतां सांडींगा चित्ताई भ्रांत । पुर्वीं मनोरथ आपले ॥३९॥ ऐसें बोलतांच सुंदरा । तंव वाणी कांपतसे थरथरा । धिक्‌ माझें जन्म दातारा । विषय व्यभिचारा प्रवर्तलें ॥४०॥ मी मतीहीन अज्ञान भारी । कुबुद्धि अमंगल शरीरीं । व्यर्थ भूमीभार संसारीं । मग अंतरीं पस्तावला ॥४१॥ होता विषयभाव मनीं । तो गळीत झाला तत्‌क्षणीं । मग धांवुनी लाला चरणीं । मजलागुनी उद्धरावें ॥४२॥ अन्यास झाला माते । सर्व शब्द क्षमा करीं वो दुरितें । ते माते पुण्य पवित्रे धैर्यवंते । मी मोहीत मूढमति हणोनियां ॥४३॥ आतां मज आणि कबीरासी । भेट करवीं दोघांसी । मज उद्धरावें त्वरेसी । म्हणोनि च्रणामिठी घाली ॥४४॥ मग म्हणे भला भला गा शेटी । बरवा भाव धरिला पोटीं । आतां चला उठाउठी । करीन भेटी कबीरासी ॥४५॥ मग उठोनि दोघेंजण । त्वरें आटोपिलें दुकान । वेगें चालिले टाकिलें भुवन । देखिले चरण कबीराचे ॥४६॥ घातले दंडवत नमस्कार । म्हणे मी अपराधी थोर । माझा करावा जी उद्धार । अभयकर ठेवूनियां ॥४७॥ कबीर अंतरज्ञानी पूर्ण । ओळखिलें तयाचें चिन्ह । मग स्वकरें कुरवाळून । दिधलें दान अक्षयीं ॥४८॥ कबीरभक्त ज्ञान विश्वासी । सदा संतुष्ट आणि उदासी । झाला रूप स्वय्पंप्रकाशी । उडाला भाव द्वैताचा ॥४९॥ ग्रेथूनि कथा रसाळ पुढती । एकाग्र होवोनी परिसिजे श्रोतीं । नामा सांगे भक्तांची विभूति । होय सुखप्राप्ति स्वानंदें ॥५०॥ इती श्री ग्रंथ नामावली जे । प्रार्थना करती प्रात:काळीं । तयाच्या पापाची होय होळी । होय अक्षयीं दास रामाचा ॥५१॥