भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगोळिये विठा कडियेसी नारा । राजाई पंढरपुरा चालियेली

angoliye vitha kadiyesi nara | rajai pandharapura chaliyeli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अंगोळिये विठा कडियेसी नारा । राजाई पंढरपुरा चालियेली ॥१॥ भिवरा संपूर्ण जातसे भरयेली । राजाई बोलली कैसें जालें ॥२॥ एकली मी बाळें काय करूं आतां । आहा पंढरिनाथा काय केलें ॥३॥ एक बांधिलें पाठीसी दुजें बांधिलें पोटासी । वेणुनादापाशीं वाहावत गेली ॥४॥ हंबरडा हाणोनि बोभाये नामया । आवर्तीं पडोनियां तळास गेली ॥५॥ योगनिद्रा सारोनि देव जागा जाला । त्वरित पावला काढिलीं तिघें ॥६॥ नारा विठा दोघे कडियेसी घेतले । राजाईस धरिलें दक्षिण करीं ॥७॥ आणिलीं महाद्वारा पुढें दे लेकुरां । विठोबा सामोरा नामा आला ॥८॥ बाबा बाबा म्हणोनि नारा धाविन्नला । नामा त्या बोलिला परतें होई ॥९॥ देखोनि राजाईसी गहिंवरू पैं आला । अरे बा विठ्ठला काय केलें ॥१०॥ बाळेसहित विख घेईन मी आतां । पाहे पंढरिनाथा बुडवीन घर ॥११॥ मेला सर्प होतां तो ओटिये घेतला । खांडोनि घातला डेर्‍यामाजीं ॥१२॥ खालीं ज्वाळ घाली उकळी फुटली । पोटासी धरिलीं दोघें बाळें ॥१३॥ देह विठोबासी समर्पण करूं । ऐसा पैं निर्धारू धरियेला ॥१४॥ रुक्मिणी म्हणे देवा अनर्थ मांडिला । नामा बाहेर गेला निश्चयेंसी ॥१५॥ डेरा उघ्डोनि राजाई जंवा पाहे । तोंडभरीं भरलाहे अवघें सोनें ॥१६॥ राजाईनें धरिले नामयाचे चरण । कृपादृष्टीं पाहणें आम्हांकडे ॥१७॥ विठ्ठल विठ्ठल ऐसें बोलियेला । निवांत राहिला घटका चारी ॥१८॥ कांपत कांपत महाद्वारीं आला । तुझी माव विठ्ठला नकळे कांहीं ॥१९॥ अष्ट दिशा देवा वरूता आणि खालुता । तुजविण सर्वथा ठाव नाहीं ॥२०॥ तंव नामदेव निजला देखिला । अंतरीं उठिला विठ्ठल ध्वनी ॥२१॥ राजाई म्हणे प्रयत्न न चले तेथें आतां । प्रार्थूं पंढरिनाथा बहुतांपरी ॥२२॥ राजाईनें धरिले विठोबाचे पाय । कृपादृष्टिं पाहे आम्हांकडे ॥२३॥