भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगाची सेज फणि छाया धरी । सहस्रमुखीं करी स्तुति शेष

angachi sej phani chhaya dhari | sahasramukhin kari stuti shesh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अंगाची सेज फणि छाया धरी । सहस्रमुखीं करी स्तुति शेष ॥१॥ परि तयातें तुझें चरित्र आकळीत । तेथें माझें गीत कोणीकडे ॥२॥ कैशापरी तुज ध्यावें देव देवा । हें वर्म केशवा सांग मज ॥३॥ मार्कंडेयो भृशुंडि लोमहर्ष अगस्ति । करितां तुझी स्तुति कल्प गेले ॥४॥ ध्यानीं पाहतां तुज न पवती योगी । तेथें मी तो रोगी कोणीकडे ॥५॥ ब्रह्मचर्यव्रत आचरती देव । ऋषिमुनि सर्व करिती सेवा ॥६॥ परि तुवां गर्व हरिला तयांचा । तेथें माझी वाचा कोणीकडे ॥७॥ इतुकें ऐकोनि बोले केशिराज खुणें । आरुता येंइ ह्मणे नामयासी ॥८॥ मुखीं माझें नाम ह्लदयीं धरूनि प्रेम । हेंचि तुज वर्म सांगितलें ॥९॥