भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें तीर्थ सर्वोत्तम । सांगतसे पुरुषोत्तम

aisen tirtha sarvottam | sangatase purushottam

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें तीर्थ सर्वोत्तम । सांगतसे पुरुषोत्तम । शंकरादि परमधाम । ब्रह्मनाम वर्णित ॥१॥ क्षेत्रमहिमा अति अद्‌भुत । आदि सिद्धेश्वर कुळदेवत । समर्थ महाभागवत । नामें गर्जत सर्वकाळ ॥२॥ म्हणे पुंडलिक पूर्वींचे स्थळ । आणि शिवाचें मूळपीठ निर्मळ । तेथें निर्विकल्प सोज्वळ । तप विशाळ जोडिले ॥३॥ क्षेत्र पंढरीहुनी अधिक । ऐसें बोलती ब्रह्मादिक । म्हणती धन्य येथिंचे लोक । शुद्ध भाविक प्रेमळ ॥४॥ घडे महाविष्णूचें पूजन । तीर्थ व्रत संध्यास्नान । वाचे हरिनाम कीर्तन । श्रवणीं गुण विष्णुचे ॥५॥ विठोजी म्हणे ऐक भक्ता । तपोनिधी महंत तूं सर्वथा । ज्ञानदेवासारिखा वक्ता । मज आवडता न दिसे ॥६॥ तुम्ही दोघे असा या सृष्टीं । जग उद्धारीं पाटोवाटीं । कीर्तन करितां उठाउठीं । तो वैकुंठीं पावावें ॥७॥ पुंडलिकें नमस्कारिले हरी । चरणचज वंदिले शिरीं । म्हणे मी भाग्याचा उजरी । तूं कैवारी आमुचा ॥८॥ नामा म्हणे देशभक्त । एक होऊनि समस्त । निवृत्तिराज स्तुति बोलत । प्रेम अद्‌भुत दाटलें ॥९॥