भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें पांडुरंग बोलिले । मग सकळ तीर्थांसी सांगितलें

aisen pandurang bolile | mag sakal tirthansi sangitalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें पांडुरंग बोलिले । मग सकळ तीर्थांसी सांगितलें । आळंकापुरीं वसिजो वहिलें । भक्त तारावया ॥१॥ जो जो करील कीर्तन । तो तो तरेल जाण । आळंकापुरीं नारायण । स्वयें उभे असती ॥२॥ ऐसा निरोप तीर्थांसि । ते तिष्ठति अहर्निशीं । कीर्तन करितां गजरेंसि । वैकुंठासी नेवों म्हणती ॥३॥ देव म्हणे यमुना नर्मदा । सरस्वति भागीरथी त्रिविधा । गंगा कृष्णा तुंगभद्रा । इंद्रायणीस मिळावें ॥४॥ जो जो भक्त येईल स्नाना । तो पवित्र कराया ये क्षणा । वैकुंठ कैलसापर्यंत जाणा । त्यासी घेवुनि यावें ॥५॥ हो म्हणती तीर्थें सकळें । मग मीनली आपुलेनि मेळें । गुप्त राहोनि यथाकाळें । आज्ञा शिरसा वंदिती ॥६॥ गया काशी त्रिवेणी । त्या शोभती विठठलचरणीं । ज्ञानदेवा समाधिरंगणीं । अखंड वाहों लागल्या ॥७॥ सुवर्णाचा अश्वत्थ । द्वारीम स्थापुनि निवास । भोवते देव्हडे तापस । समाधीस बैसले ॥८॥ देव म्हणे जो करील तप । तो होईल निष्पाप । केवळ होईल शिवरुप । आत्माराम साक्षात ॥९॥ जप तप नेम मंत्र ध्यान । कोटि याग घडले पूर्ण । अथवा द्विजीं दिधलिया अन्न । चतुर्भुज नर होती ॥१०॥ ऐसें वचन सांगे हरी । ज्ञानदेवासी धरिलें करीं । निवृत्ति सोपान अंतरीं । ध्यान धरोनी राहिले ॥११॥ नामा म्हणे कोटि तीर्थांचे । तीर्थं वोळलें पैं साचें । पाप जाईल अनंत जन्मांचें । एक स्नान केलिया ॥१२॥