भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें आळंकापुर पीठींचे । भक्त नांडती दैवाचे

aisen alankapur pithinche | bhakta nandati daivache

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें आळंकापुर पीठींचे । भक्त नांडती दैवाचे । जे कां सागर भाग्याचे । ज्ञानउदयो प्रकासिते ॥१॥ मग षोडश उपचारीं । पूजा ज्ञानदेव आदरीं । दिव्यवाद्यें मंगलतुरीं । ओवाळिती पंचारतियां ॥२॥ ज्ञान सोपान निवृत्ती । मुक्ताई प्रत्यक्ष ज्योती । ओंवाळिती विष्णूमूर्ती । चतुर्भुज पैं ॥३॥ पीतांबरधारी श्याममूर्ति । शंखचक्राची आकृती । उद्धव अक्रूर ढाळिती । चवरें वरी ॥४॥ प्रत्यक्ष लक्ष्मी आपण । दिव्य स्वरुप प्रसन्न वदन । माजी मिरवे दिव्य सिंहासन । त्यावरी आरुढली ॥५॥ पुढें गरुड जोडल्या करीं । उभा पक्षांचा फडत्कारी । सूर्य लोपे तेजाकारी । अमृतकरु नाम एक ॥६॥ गोपाळ देव्हडे उभे । मंजुळ पावे वेणुप्रभें । शुभकाल सुप्रभें । माजी स्तुति मांडिली ज्ञानदेवें ॥७॥ नामा म्हणे ऐका । पुढें ग्रंथाची पीठिका । तो तारील सकळ लोकां । एक एक अक्षर आईकतां ॥८॥