भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे स्वर्गवासी अमर । ते आपुलाले ठायीं स्थिर

aise svargavasi amar | te apulale thayin sthir

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसे स्वर्गवासी अमर । ते आपुलाले ठायीं स्थिर । राहोनि करिती जयजयकार । पुष्पवृष्टे ज्ञानदेवावरी ॥१॥ धन्य धन्य तूं विष्णुभक्ता । ज्ञानदेवा तूं समर्था । म्हणौनि पडती पुष्पचळथा । ज्ञानदेवावरी ॥२॥ अनंत तीर्थांचा मेळ । उदकें शिंपिती ब्रह्मगोळ । लोहगिरी सुवर्णचळ । त्यावरी आळंकापुरी ॥३॥ म्हणती धन्य धन्य हे जन । जेथें जो करील कीर्तन । तया जोडे वैकुंथस्थान । चतुर्भुज होऊन जाईल ॥४॥ देव म्हणती इंद्रासी । तूं पूर्वीं येथेंच होतासी । आणि ब्रह्मा रुद्र तापसी । पूर्वापर हे पुरी असे ॥५॥ कृत त्रेत हे द्वापारादि । येथें सकळांची समाधी । धन्य ज्ञानदेव गोविंदीं । रतोनी येथें बैसले ॥६॥ इंद्र म्हणे विष्णुभक्त थोर । प्रत्यक्ष हेहि हरिहर । निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर । हेहि अवतार हरीचे ॥७॥ ऐसें सांगितलें समस्तां । मग विदित जालें उभयतां । शक्र जाहला निघता । ब्रह्मा आदि करुनीं ॥८॥ शेषही पाताळासी गेला । पुंडरिक गोपाळ राहिला । आळंकापुरा स्थिरावला । सकळां भक्तां सहित ॥९॥ सवें संतांचा मेळ । ऐसा राहिला गोपाळ । नामा म्हणे चक्रचाळ । पुढें कैसें वर्तलें ॥१०॥