भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा निवृत्ती स्थिरावला । महाविष्णु संतोषला

aisa nivrutti sthiravala | mahavishnu santoshala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसा निवृत्ती स्थिरावला । महाविष्णु संतोषला । मग सोपानदेवें आरंभिला । स्तुतिवाद परियेसा ॥१॥ जयजया तूं रामकृष्णा । भक्तभाविकां हरी तृष्णा । देहीं दीपक सहिष्णा । रामकृष्ण म्हणतांचि ॥२॥ नरहरि नरकेसरी । टाळी वाउनियां गजरीं । टाळ मृदंग झणत्कारी । जयजय कृष्ण म्हणों आम्हीं ॥३॥ एक हरिविण नाहीं सखा । त्रिभुवनीं आत्मा देखा । समाधिसुखाविशेखा । चरणरजें डौरवावें ॥४॥ धन्य हे भूमिका देश । आपण हरि जगन्निवास । ज्ञानदेवीं केला वास । समाधिसुख घेऊनी ॥५॥ निवृत्ती ऐसा श्रेष्ठ गुरु । तोहि समाधीसी होय स्थिरु । तरि पुढें काय करणें विचारु । तो सांगावा स्वामिया ॥६॥ देव म्हणे ब्रह्मावतारा । या अवघिया चराचरा । श्रेष्ठ तूंचि निर्धारा । मनुष्यरुपें अवतलासी ॥७॥ सकळ हे तुझे व्यापक । चराचर हें त्रैलोक्य । अधर्मं जालिया चाळक । अवतार घेती तिघे ॥८॥ ऐसें बोले पाडुरंग । सोपान निवाला सर्वांग । म्हणे सांकडें फेडिता श्रीरंग । तूंचि श्री विठठला ॥९॥ नामा म्हणे सोपानदेवें । मागुती स्तुति आदरिली भावें । जेणें करुनियां बरवें । समाधिसेजेची ॥१०॥