भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनियां वाणी पातली ते रमा । बोलिली विश्रामा जीवाचिया

aikoniyan vani patali te rama | bolili vishrama jivachiya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐकोनियां वाणी पातली ते रमा । बोलिली विश्रामा जीवाचिया ॥१॥ दुर्जनाचा भाव ऐसाचि वोखटा । दर्प त्याचा मोठा आवरेना ॥२॥ दुसर्‍याचें बरें तें कैसें सोशिती । बळें निखंदिती साटोपानें ॥३॥ दीपाचा प्रकाश सोशीना पतंग । जळताही अंग झेंप घाली ॥४॥ चंद्रोदया आधीं फुटतील डोळे । ते काय कावळे पाहातील चंद्र ॥५॥ आधींच सावत्र संबंधी पापीण । राजाही आधीन जिच्या झाल्या ॥६॥ सिंहासनीं याच्या मांडीये बैससी । हें ते कैसें सोसी निसंगळ ॥७॥ दैवहीन आम्हीं देवचि कोपला । आपुला तो झाला परावा कीं ॥८॥ देवें द्यावें तेव्हां भोगावें सकळ । न चले कदा बळ दुसर्‍याचें ॥९॥ कासया तूं बाळा स्फुंदसी दु:खानें । देवाहून कोण सखें आम्हां ॥१०॥ नामा म्हणे हित ऐकतां मायेचें । चित त्या बाळाचें उठावलें ॥११॥