भजनी मालिका
← भजनांकडे परत

आघात न चले आणची जवळीं । म्हणे कोण बळी साह्यकर्ता

aghat na chale anachi javalin | mhane kon bali sahyakarta

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आघात न चले आणची जवळीं । म्हणे कोण बळी साह्यकर्ता ॥१॥ कोठें राहतो कैसा कोण सांग । येरू म्हणे वेग नाहीं कोठें ॥२॥ सर्वां ठायीं आहे व्यापुनी सगळा । नाहीं तो निराळा कोठें पाहतां ॥३॥ जळीं काष्ठीं आहे माझें अंतरंग । सखा पांडुरंग मायबाप ॥४॥ ऐकतांचि बोल राजा कोपावत । म्हणे तो निश्चीत काष्टीं आहे ॥५॥ सभास्तंभीं आहे संदेह तो काय । ऐकतां स्वयमेव उठीयला ॥६॥ काढूनि खडगासी मारीत स्तंभासी । करीत नादासी हरिरूप ॥७॥ भक्ताच्यावचना कोरडिया कष्टीं । सत्य करी गोष्टी नारायण ॥८॥ महानाद झाला त्रिभुवन भ्याला । गर्भपात झाला स्वर्गलोकीं ॥९॥ फुटों पाहे अंड बुडों पाहे क्षिती । ऐसी होती गति तये काळीं ॥१०॥ स्तंभ तो चिरला नरहरी देखिला । भयाभीत झाला राजा तेव्हां ॥११॥ परी शूर क्षेत्रीं न टाकी धैर्यासी । घेऊनि खड्गासी धांवियला ॥१२॥ धांवोनियां जातां धरिला तात्काळ । चिरीतां ते वेळ मांडीवरी ॥१३॥ नखें घाय केला ह्रदयीं चिरीला । काढी अंत्रमाळा पोटांतुनी ॥१४॥ रुधिर जिव्हेनें चाटी करी शोष । भय बहु त्नासें उग्ररूपीं ॥१५॥ मानव शरीर सिंहवदन हरी । गुरगुर तो करी देवराव ॥१६॥ अवतार वेळा वैशाख मासी । चतुर्दशी संधीसीं अर्धबिंबी ॥१७॥ दिवा रात्रीं स्वाती नक्षत्नासी । प्रगटला ज्योतीसीं दैयहर्ता ॥१८॥ घरीं ना मंदिरीं सभे ना बाहेरी । उंबरीयावरी मारीयेला ॥१९॥ शस्रानें न मरे ऐसा वर होता । ह्मणोनि नखें त्याचा अंत केला असे ॥२०॥ वर राखोनियां केला वध पाही । दासाची नवाई वाढवीत ॥२१॥ शब्द जो कां झाला प्रगटतां रूप । तेणें अंतराळीं अमूप नाद भरे ॥२२॥ नक्षत्रें पडती भूमीं रिचवती । भयेंचि खालती आघाट ते ॥२३॥ ब्रम्हांदिकां भय त्रास उपजला । धांऊनियां आला दर्शनासी ॥२४॥ सहित देवगण करीत स्तुतिसी । न होय शांतीसी कांहीं केल्या ॥२५॥ रामा पूर्ण माये आली ते समयीं । तिसी ते वैभवी साहवेना ॥२६॥ तये काळीं देवीं प्रल्हाद प्रार्थिला । सन्मुख गेला उग्ररूप ॥२७॥ प्रेत टाकियेलें शांतरूप झाला । प्रल्हाद पावला आनंदातें ॥२८॥ पाहतांचि बाळ वोसंगा घेतला । हातें कुर्वाळिला भक्तराज ॥२९॥ देव सुर राज्यीं बैसऊनि हरी । स्वरूप संहरी उग्रबाव ॥३०॥ राज्यीं बैसविला प्रल्हाद निजभक्त । केली जगीं ख्यात नामा म्हणे ॥३१॥