भजनी मालिका

भजने

अग्नि तापलिया काया चि होमे । तापत्रयें संतप्त होती । संचित क्रियमाण प्रारब्ध तेथें । न चुके संसारस्थिति । राहाटघटिका जैसी फिरतां चि राहिली । भरली जाली होती एके रितीं । साधीं हा प्रपंच पंचाय अग्न । तेणें पावसील निजशांती रे ॥१॥ नारायण नाम नारायण नाम । नित्य करीं काम जिव्हामुखें । जन्म जरा व्याधि पापपुण्य तेथें । नासती सकळ ही दुःखें रे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अग्नि हा पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवें तोचि तापे जाणोनियां ॥१॥ उदक म्हणे काय या हो मज प्यावें । तृषित तो धांवे सेवावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अग्निसंस्कार देउनी त्यासी । संपादिलें उत्तर विधीसी । मग निजगजरें उग्रसेनासी । स्थापिलें राज्य सिंहासनीं ॥१॥ नवाचि ध्वज नवें छत्र । व्दाहीं फिरविली सर्वत्र । साखरा वांटूनियां नगरांत । केले दानपात्र परमसुखी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अग्नी जाळी तरी न जळती पांडव । ह्रदयीं माधव म्हणोनियां ॥१॥ अग्नी जाळी तरी न जळती गोपाळ । ह्रदयीं देवकीबाळ म्हणोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अग्नीची व्हावया शांती । उपाय आहे तुमच्याचि हातीं । लावोनियां बैसा पातीं । डोळेचि झांकुनी बळकट ॥१॥ उघडे ठेवितां चेतले वन्हीं । मग तो नाटोपे आम्हां लागुनी । सांडील अवघीयांसीच जाळुनी । झांका म्हणउनी निज नेत्र ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अंतु । होय शुद्ध न पवे धातु । पटतंतुप्रमाणे ॥१॥ बाह्यरंगाचें कारण । मिथ्या अवघें चि भाषण । गर्व ताठा हें अज्ञान । मरण सवें वाहातसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अग्नीस आपदा बहुवस । रावणाचे असोस । नानापरीचे स्पर्शदोष । धूई अहर्निशीं धुपधुपीत ॥१॥ उदक सेवा वरुणा हातीं । विंजणें सेवा नित्य वसती । निरोप सांगावया बृहस्पती । प्रजापती शांतिपाठा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अचळ न चळे ऐसें जालें मन । धरूनि निजखुण राहिलों ते ॥१॥ आवडी बैसली गुणांची अंतरीं । करूं धणीवरी सेवन तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अचुक साधन कष्ट नाहीं कांहीं । वाचे विठ्ठलरखुमाई म्हणे सुखें ॥१॥ जन्ममरणाच्या तुटतील खेपा । सोपा होय बापा मार्ग तुज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अच्युता अनंता श्रीधरा माधवा । देवा आदि देवा पांडुरंगा ॥१॥ कृष्णा विष्णु हरि गोविंदा वामना । तूंचि नारायणा नामधारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव