भजनी मालिका
← भजनांकडे परत

ये रे कृष्णा खुणाविती खेळों भातुकें । मिळालिया बाळा एके ठायीं कवतुकें

ye re krushna khunaviti khelon bhatuken | milaliya bala eke thayin kavatuken

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ये रे कृष्णा खुणाविती खेळों भातुकें । मिळालिया बाळा एके ठायीं कवतुकें । कळों नेदी माया त्यासचि ते ठाउकें । खेळतोंसें दावी लक्षलक्षापें मुकें ॥१॥ अखंडित चटे त्यांनीं लावियेला कान्हा । आवडे तया ते वाहाती संकल्प मना । काया वाचा मनें रूपीं गुंतल्या वासना । एकांताचें सुख जाती घेवोनियां राणा ॥ध्रु.॥ अवघियांचा जाणें झाला मेळासा हरी । मिळोनियां जावें तेथें तया भीतरी । कळों नेदी घरिच्या करी गोवूनी चोरी । हातोहातीं नेती परेपरत्या दुरी ॥२॥ आनंदें निर्भर आपणाशीं आपण । क्रीडतील बाळा त्यजिलें पारिखें जन । एकाएकीं तेथें नाहीं दुसरें भिन्न । तुका म्हणे एका नारायणा वांचून ॥३॥