भजनी मालिका
← भजनांकडे परत

विदेह आत्मलिंगा गुरुकृपेचा तुषारु

videh atmalinga gurukrupecha tusharu

विदेह आत्मलिंगा गुरुकृपेचा तुषारु । पूर्णे पूर्ण भरिला घटु हळुहळु बिंदु उदारु । वरुषला लिंगावरि तेणें तुष्टला श्रीगुरु । प्रसन्न निवृत्तिराजा ज्ञान देउनि उदारु ॥१॥ यालागिं ज्ञानदेवो नाम गुरुकृपेनें पावलों । असतां इये देहीं संसारा हारपलों । ज्ञानविज्ञान कळो आलें अद्वैतरुप बुझालों । विठ्ठल नाम माझे वाचे तेणें वागपुष्प पावलों ॥२॥ नित्य गळति नामें जालीं गेला प्रपंच अनिवार । उपरती देहीं जाली निमाली वासना संसार । तपन जालें ब्रह्ममूर्ति दिननिशीं साचार । आठवितां मागिल भावो अवघा पारुषला उदारु ॥३॥ विज्ञानेंसि ज्ञान गेलें एकरुप परिचार । ज्योतिमाजि कळिका गेली एकदीप जाला आकार । वृत्ति ते निवृत्ति जाली माया मारुनि केलें घर । निवृत्ति गुरु माझा घट स्थापिला त्या समोर ॥४॥ ज्ञानदेवें घटमठ निरोपिली हरिभक्ति । उडाली पक्षपाती इंद्रिया तेथें नाहीं गती । विराले अभिमान ममता जाली समाप्ती । खुंटलिया उर्मी दाहि स्त्रपन जालें लिंगाप्रती ॥५॥