भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य । न करिती विचार कां हिताचा

vate ya janachen thor ba ashcharya | na kariti vichar kan hitacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य । न करिती विचार कां हिताचा ॥१॥ कोण दम ऐसा आहे यांचे पोटीं । येईल शेवटीं कोण कामा ॥ध्रु.॥ काय मानुनियां राहिले निंश्चिती । काय जाब देती यमदूतां ॥२॥ कां हीं विसरलीं मरण बापुडीं । काय यांसी गोडी लागलीसे ॥३॥ काय हातीं नाहीं करील तयासी । काय जालें यांसी काय जाणों ॥४॥ कां हीं नाठविती देवकीनंदना । सुटाया बंधनापासूनियां ॥५॥ काय मोल यासी लागे धन वित्त । कां हें यांचें चित्त घेत नाहीं ॥६॥ तुका म्हणे कां हीं भोगितील खाणी । कां त्या चक्रपाणी विसरती ॥७॥