भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपजोनि संसारी आपुला आपण वैरी

upajoni sansari apula apan vairi

उपजोनि संसारी आपुला आपण वैरी । मी माझे शरीरीं घेऊनि ठेला । या देहातें म्हणे मी पुत्र दारा धन माझें । परि काळाचें हें खाजें ऐसें नेणतु गेला ॥१॥ कामक्रोधमदमत्सराचेनि गुणें । बांधला आपण नेणे भ्रमितु जैसा । मिथ्या मोह फ़ांसा शुक नळिके जैसा । मुक्त परि अपैसा पळों नेणें ॥२॥ जळचर आमिष गिळी । जैसा का लागलासे गळीं । आपआपणापें तळमळीं । सुटिका नाहीं ॥ तैसें आरंभी विषयसुख गोड वाटे इंद्रियां फ़ळपाकीं पापिया दु:ख भोगी ॥३॥ राखोंडी फ़ुंकिता दीप न लगे जयापरी । तैसा शब्द ब्रह्मकुसरी ज्ञान न पवे । व्रत तप दान वेचिलें पोटा दंभाच्या खटपटा सिणतु गेला ॥४॥ मृगजळाची नदी दुरुनि देखोनि । धांवे परी गंगोदक न पवे तान्हेला जैसा तैसें विषयसुख नव्हेचि हित । दु:ख भोगितो बहुत । परि सावधान नव्हे ॥५॥ परतोनि न पाहे धांवतो सैरा । करितो येरझारा संसारींच्या । ज्ञानदेव म्हणे बहुतां जन्मांचा अभ्यासु । तरीच होय सौरसु परब्रह्मीं ॥६॥