भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपदेश मदलसा देहो निर्मिला कैसा आलासी कवण्या

upadesh madalasa deho nirmila kaisa alasi kavanya

उपदेश मदलसा देहो निर्मिला कैसा आलासी कवण्या वाटां मातेचिया गर्भवासा । जो पंथ वोखटारे पचलासि कर्मकोठा । अविचार बुध्दि तुझी पुत्रराया अदटा ॥१॥ पर्ये दे मदलसा सोहं जोजोरे बाळा । निजध्यानीं निजपारे लक्ष लागों दें डोळा । निज तें तूं विसरलासि होसि वरपडा काळा ॥२॥ नवामास कष्टलासी दहाव्याने प्रसूत जाली । येतांचि कर्मजाड तुझीं मान अडकली । आकांतु ते जननी दु:खें धाय मोकली । स्मरे त्या हरिहराध्यायीं कृष्णमाउली ॥३॥] उपजोनि दुर्लभुरे मायबापा जालासी । वाढविती थोर आशा थोर कष्टी सायासी । माझें माझें म्हणोनियां झणीवायां भुलसी । होणार जाणार रे जाण नको गुंफ़ों भव पाशीं ॥४॥ हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बांधा । वरि चर्म घातलेरे कर्मकीटकाचा सांदा । रवरव दुर्गधारे अमंगळ तिचा बांधा । स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा ॥५॥ या देहाचा भरंवसा पुत्रा न धरावा ऐसा । माझें माझें म्हणौनियां बहु दु:खाचा वळसा । बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा । तृष्णा सांडुनियां योगी गेले वनवासा ॥६॥ या पोटाकरणेरे काय न करिजे एक । यालागि सोय धरीरे तिहीं भुलविलें लोक । ठाईचें नेमियलें त्याचें आयुष्य भविष्य । लल्लाटीं ब्रह्मरेखा नेणती ते ब्रह्मादिक ॥७॥ जळींचीं जळचरेंरे जळींचियारे रमती । भुललीं तीं बापुडीरे ते कांही नेणती । जंव नाहीं पुरलीरे त्याचि आयुष्यप्राप्ति । वरि घालुनि भोंवरजाळ बापा तयातें गिवसिती ॥८॥ पक्षणी पक्षीयारे निरंजनीं ये वनीं । पिलिया कारणेरे गेलिचारया दोन्ही । अवचिती सांपडली पारधिया लागुनी । गुंतोनि मोहोपाशीं प्राण त्यजिती दोन्ही ॥९॥ मृग हा चारियारे अतिमाने सोकला । अविचार बुध्दि त्याची परतोनि मागुता आला । तंव त्या पारधियानें गुणीं बाणु लाविला । आशारे त्यजूनियां थिता प्राण मुकला ॥१०॥ अठराभार वनस्पती फ़ुलीं फ़ळीं वोळती । बावित्या पोखरणी नदी गंगा वाहती । ज्या घरीं कुलस्त्रीयाराज्य राणीव संपत्ती । हें सुख सांडूनिया कासया योग सेविती ॥११॥ हें सुख सांडूनिया कोण फ़ळ तयासी । कपाट लंघूनियां योगी ध्याती कवणासी । योग तो सांग मज कवण ध्यान मानसीं । सर्वत्र गोविंदुरे ह्रदयीं ध्याई ह्रषिकेशी ॥१२॥ इतुकिया उपरि रे पुत्रा घेई उपदेशु । नको भुलों येणे भ्रमें जिवित्त्वाचा होईल नाशु । क्षीरा निरा पारखीरे परमात्मा राजहंसु । निर्गुण निर्विकार पुत्र सेवी ब्रह्मरसु ॥१३॥ इतुकिया उपरीरे मातें विनवितां जाला । संसार सोहळा हा थोरा कष्टीं जोडला । पंच भूतें निवती येथें म्हणौनि विश्रामु केला । वोखटा गर्भवासु कवणा कार्या रचिला ॥१४॥ गर्भाची यातनारे पुत्रा ऐके आपल्या कानी । येतां जातां येणें पंथे सांगाति नाहिरे कोण्ही । अहंभावो प्रपंचु पुत्र सांडीरे दोन्ही । चौर्‍यांशी जीवयोनी पर्तले मुनिजन तत्क्षणीं ॥१५॥ वाहतां महापुरी रे पुत्रा काढिलें तुज । रक्षिलासी प्रसिध्द सांपडले ब्रह्मबीज । मग तुज वोळखी नाहीं कारें नेणसि निज । आपेआप सदगुरु कृपा करील सहज ॥१६॥ उपजत रंगणारे पुत्रा तुवा जावें वना बैसोनि आसनीरे पाहे निर्वाणीच्या खुणा । प्राणासी भय नाहीं तापत्रये चारणा । मग तुज सौरसु पाहारे परब्रह्मींच्या खुणा ॥१७॥ बैसोनि आसनीरे पुत्रा दृढ होई मनीं । चेतवी तूं आपणापे चेतविते कुंडलिनी । चालतां पश्चिमपंथें जाई चक्रें भेदुनी । सतरावी जिवनकळा पाहे आत्मा हा चिंतुनी ॥१८॥ मग तूं देखसी त्रिभुवन स्वर्ग पाताळ । नको भुलों येणें सांडीं विषय पाल्हाळ । आपणापे देखपारे स्वरुप नाहीं वेगळें । परमात्मा व्यापकुरे पाहा परब्रह्म सांवळें ॥१९॥ इतुकिया उपरीरे पुत्रा विनवीतें जननी परियेसि माउलिये संतोषलों ततक्षणीं । इंद्रायणी महातटीं विलासलों श्रीगुरुचरणीं । बोलियेले ज्ञानदेवो संतोषलों वो मनीं ॥२०॥