भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपदेश ब्रह्मज्ञान पुत्रा ऐकरे बीज

upadesh brahmadnyan putra aikare bij

उपदेश ब्रह्मज्ञान पुत्रा ऐकरे बीज । सांडि सांडि मायामोहो मुक्त विचरेरे सहज । आशा मनसा गुंफ़ो नको सोहं धरिकारे नीज । अखंड गुरुचरणी मोन्य धरिकारे काज ॥१॥ उपदेशी मदलसा निजकारे आधीं । पूर्णबोधें उमजेरे हेंचि साधी समाधी । लटिका हा मायामोह लक्ष लावा गोविंदीं । सांडि मांडि कोहंवेगीं लीन होई परमानंदीं । जे जो जे जो जे जो बाळा ॥२॥ चौर्‍यांशीलक्ष जीव जंतु शिणले योनी येतां जातां । विरळा देखों परतला जो पारुषला संपूर्णता । मनबुध्दि एकचित्तें दृढधरी अनंता । उपरति चित्तें करी सावध होई त्त्वरिता ॥३॥ जन्म हें दुर्लभ जाणा मनुष्यजन्म अगाध । ज्ञानध्यान बुझिजे आधीं वरी गुरुचा प्रबोध । तरीच साधेल तुज नाहीं तरी होसी मूढ अंध । नेमिलें आयुष्य वेचे कोण कोण तोडी भवबंधकंद ॥४॥ नवमास होतासि गर्भी अधोवदनें दु:खित । तैं होता उमजुतुज कारें येथें निश्वित । परतोनि पाहे वेगीं मनीं धरी अच्युत । तुटेल योनिपंथू मग तूं सर्वातीत ॥५॥ जंववरी माझें माझें मन न संडी तुझें । तंववरी मोहोपाश व्यर्थ धरणिये ओझें । विष्ठामूत्र जंतगर्भी म्यां वाहिलें तुझें ओझें ॥६॥ उठीं पुत्रा सावध होई मी माझे सांडि धरी । कोशकिटके जन्मलासि तैसें तूं बा न करी । आपण्या आपण होसी तुझा तूंचिरे वैरी । जंव नाहीं आलें काळचक्र वेगी स्मरे मुरारी ॥७॥ इंद्रियें सावध अहाति तव करी धांवा धांवी । मग विस्मृति पडेल बुध्दि मगन साधे हरि गोसांवी । सर्वघटी हरि ध्याय मनचक्षु एकभावी नारायणनामपाठ वेदशास्त्र अनुभवी ॥८॥ दिननिशीं शरीर तुझें बाळतरुणवृध्द होय । काया हे नव्हे तुझी सांडी सांडी ममता माया । निर्गुणरुप हरिहरु त्यासि तूं शरण जाय । सगुणीं झोंबों नको हरिरुपीं तल्लीन राहे ॥९॥ मृगजळ मायपूर व्यर्थ इंद्रियांचि झोंबी । कामना लपवी आधीं लय लावी हरिच्या बिंबी । चक्षें पक्षें मन गोवी बिरडें घाली निरालंबी । शुध्दबुध्द तत्त्व हरि एकतत्त्व नितंबी ॥ गुरुगम्य आगमाचे हेंचि तत्त्व उत्तम । सत्त्व रज तमीं गुंफ़ो नको मा मार्ग धरी उत्तम । प्राण लपवी प्राणामाजी वासनाकारी नि:ष्काम ॥१०॥ हेंची साधन योगियांचें शिवाचें मनोगत । उठोनियां प्रातकाळीं तनुमनध्यान नित्य । जागरणिं हरिकीर्तनी उध्दरसी त्त्वरित । नाशिवंत शरीर जाण मग तुज न घडे हित ॥११॥ क्षणां एका शरीर नासे हें तुझें तुज न कळे । अवचिता येईल काळ झांकतील देखणे डोळे । मग हें नाठवे तुज करि गुरुमेळीं निर्मळ । सांडी मांडी करुं नको टाकिं टाकी मनीचे सकळ ॥१२॥ व्यर्थरे राहासी येथें पडशील मोहोफ़ांसा । दशदिशा हरि आहे ऊर्ध्व अध महेशा । मही हे अंथरुण आकाश करी अवकाश । या परि विचिरें रे राहवें प्रमाण सरिसा ॥१३॥ तत्त्व हें एकरुप हरिविण नाहीं कोठें । द्वैतभाव न धरी मनीं नीटजाय वैकुंठ ॥ हा मार्ग योगियांचा संत गेले नीट वाटे ॥१४॥ सनकादिकां पंथ हाचि सेविला उपजंता । नारदें विचार केला मग न राहे तो निवांता । गोरक्ष बुझला वेगी दृढ कास हनुमंता । अवधूत याचि परि दत्तामाजी पूर्णता ॥१५॥ उन्मनि साधी बाळा रुप न्याहाळी नयनीं । नासिकीं ठेऊनि दृष्टि खेंचरी मुद्रा निर्वाणी । शरीर हें असों जावों याची न करी तूं करणी । रामकृष्ण वाचा पाठ हेंचि धरी निर्वाणी ॥१६॥ अष्टदळ ह्रदयी आहे तोचि आत्मा ये करी । मन बुध्दि वित्त चित्त दिसों नेदी वोहरी । मातापिता प्राण तुझे तो दाखविल शरीरीं । स्त्रीपुत्र इंद्रियद्वारा सांडी परति माघारी मन हें कोंडी पिंडीं तंतू तुटो नेदी याचा । मार्ग हे जिव्हे पारुषरे हरिरामकृष्ण वाचा । रिकामा क्षणभरी पंथ धरी प्रेमाचा । आदि मध्य हरि एक तोचि ध्यायीं ह्रदयींचा ॥१७॥ श्रवण स्मरण करि काळघाली आंकणा । भीष्में साधिलें हरि तो पावला नारायणा । लक्ष्मणें धरिली वृध्दि वोळगिला रामराणा । निमिष्य एक न भरतां शरीर सांडिले प्राणा ॥१८॥ हित तेंचि करी बाळा हरि प्रेमें मन करी । सावधान चित्त आहें तंव सर्व हे दृष्ट निवारी । भुली पडेल अंती तुज मग नाहीं कैवारी । ममतेचें बिरडें फ़ेडी उठे चाले योगरीतीं ॥१९॥ म्हणे माते परियेसी कैसे उपदेशिलें ज्ञान । गुरु हा कोण करुं अवघे दिसें विज्ञान । मज याचें स्मरण झालें सोहं होतें मज ध्यान । कोहं हें विसरलों जालें संसारमौन्य ॥२०॥ परतले प्रेमभाव उब्दोध आला धांवया । कळिकाळ न दिसे दृष्टि पापपुण्य राहावया । सभराभरित हरि दिसेमाझें कैचें उरावया । तूं तव विदेही माया मदलासा मज राखावया ॥२१॥ मदलसा म्हणे पुत्रा जो उपदेश करुणा । ब्रह्म हे जीवी शिवीं भोगि योनी नारायणा । शांति क्षमा बाणली तुज कैचें उमटलें गुज ॥२२॥ हे स्थिति बाणली ज्यासी तो मी परिपूर्ण योगी । दया मुक्ति जाली दासी नित्य उन्मनी भोग भोगी । त्याचिया दर्शनें जीव तरतील वेगीं । उठि पुत्रा जाय पंथे जेथें जेथें सत्रावी उगी ॥२३॥ मुक्तामुक्ता अभयदान मुक्त जाला अनुभवी । राहिली निरलंबी रातलासे सतरावी । मुक्ताई मुक्त ज्ञाने मदलसा नांवानांवी । मुक्तलग उपदेश चांगयास दिधला पाही ॥२४॥