भजनी मालिका
← भजनांकडे परत

तो बोले कोमळ निष्ठुर साहोनि । कोपतां गौळणी हास्य करी

to bole komal nishthur sahoni | kopatan gaulani hasya kari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तो बोले कोमळ निष्ठुर साहोनि । कोपतां गौळणी हास्य करी ॥१॥ करावया दास्य भक्तांचें निर्लज्ज । कवतुकें रज माथां वंदी ॥२॥ दिलें उग्रसेना मथुरेचें राज्य । सांगितलें काज करी त्याचें ॥३॥ त्यासि होतां कांहीं अरिष्टनिर्माण । निवारी आपण शरणागता ॥४॥ शरणागतां राखे सर्व भावें हरी । अवतार धरी तयांसाठी ॥५॥ तयांसाठी वाहे सुदर्शन गदा । उभा आहे सदा सांभाळित ॥६॥ तळमळ नाहीं तुका म्हणे चित्ता । भक्तांचा अनंता भार माथां ॥७॥