भजनी मालिका
← भजनांकडे परत

ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें

tap hen haran shrimukh | hari bhavaroga aisen duhkh | avalokitan upaje sukh | ubhen sanmukh drushtipudhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥१॥ न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेची च खाणी । स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥ध्रु.॥ रामकृष्णध्यान वामननारसिंहीं । उग्र आणि सौम्य कांहीं च नाहीं । सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥२॥ गुणगंभीर चतुर सुजाण। शूर धीर उदार नारायण । व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहनलावण्य हें ॥३॥ ठाण हें साजिरें सुंदर । अविनाश अविकार । अनंत आणि अपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥४॥ जयाची वाणी सुमनमाळा। परमामृतजिव्हाळा । अनंता अंगीं अनंत कळा । तुका जवळा चरण सेवे ॥५॥