भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटीं वो

sundar mukh sajiren kundalen manohar gomatin vo | nagar nag khopa keshar kasturi malavatin vo

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटीं वो । विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठीं वो । कास पीतांबराची चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥ अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणीं गोंधळा वो । राजस तेजोराशी मिरवी शिरोमणी वेल्हाळा वो । कोटि रविशशिप्रभा लोपल्या सकळा वो । न कळे ब्रम्हादिकां अनुपम्य इची लीळा वो ॥ध्रु.॥ सावळी सकुमार गोरी भुजा शोभती चारी वो । सखोल वक्षस्थळ सुढाळ पदक झळके वरी वो । कटीं क्षुद्र घंटिका शब्द करिताती माधुरी वो । गर्जत चरणीं वाकी अभिनव संगीत नृत्य करी वो ॥२॥ अष्टांगें मंडित काय ।वर्णावी रूपठेवणी वो । शोलिव शुध्द रसाची ओतिव सुगंध लावण्यखाणी वो । सर्वकळासंपन्न मंजुळ बोले हास्यवदनीं वो । बहु रूपें नटली आदिशक्ति नारायणी वो ॥३॥ घटस्थापना केली पंढरपुरमहानगरीं वो । अस्मानी मंडप दिला तिन्ही ताळांवरी वो । आरंभिला गोंधळ इनें चंद्रभागेतिरीं वो । आली भक्तिकाजा कृष्णाबाई योगेश्वरी वो ॥४॥ तेहतिस कोटि देव चौंडा अष्ट कोटि भैरव वो । आरत्या कुरवंड्या करिती पुष्पांचा वरुषाव वो । नारद तुंबर गायन ब्रम्हानंद करिती गंधर्व वो। वंदी चरणरज तेथें तुकयाचा बांधव वो ॥५॥