भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखें वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा

sukhen volamb davi goha | majhen duhkh nena paha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुखें वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥१॥ आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा म्हणे भिडा ॥ध्रु.॥ निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥२॥ गेले वारीं तुम्हीं आणिली साकर । सातदी गेली साडेदहा शेर ॥३॥ अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तूप पथ्या ॥४॥ दो पाहरा मज लहरी येती । शुद्ध नाहीं पडे सुपती ॥५॥ नीज नये घाली फुलें । जवळीं न साहती मुलें ॥६॥ अंगी चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥७॥ हाड गळोनि आलें मास । माझें दुःख तुम्हां नेणवे कैसें ॥८॥ तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरी नरका नेला ॥९॥