भजनी मालिका
← भजनांकडे परत

शून्याचा उदभव सांगतों या बोला

shunyacha udabhav sangaton ya bola

शून्याचा उदभव सांगतों या बोला । औटापिठीं वहिला सूक्ष्म मार्ग ॥१॥ मनपुराचे वरी द्वादश आंगुळें । तयावरी गेले अव्हाटेने ॥२॥ आतां तया सदनीं उफराटें मार्गे । वळंघिता सवेग पश्चिम पंथीं ॥३॥ पश्चिमपंथीं नाडी घोष वाहे जीचा । तेथुन ध्वनीचा विस्तार गा ॥४॥ ध्वनीचेंही वरी शुध्द तेज असे । चंद्रमा प्रकाशे तेच ठायीं ॥५॥ चंद्राचे वरी एक निराळाच मध्य । स्त्रियेचें निजबोधें निजरुप ॥६॥ निखिल जें तेज ज्याचेनी अमृत । जीववी देहींत देह दैव ॥७॥ औटापिठातळीं सर्व तें दीसे । सूर्य हा प्रकाशे तेच ठायीं ॥८॥ ज्ञानदेव म्हणे मज त्रिकुटाची गोडी । धरितां आवडी ब्रह्म लाभे ॥९॥