भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाउनियां छंदे जैसी तैसी

shila sphatikachi na palate bheden | dauniyan chhande jaisi taisi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाउनियां छंदे जैसी तैसी ॥१॥ जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥ फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥३॥ मायबापा सोडविलें बंदीहुनि । चाणूर मर्दुनी कौसादिक ॥४॥ दिक नाहीं देणें अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥५॥ मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥ पाप कोठें राहे हरी आठवितां । भक्ती द्वेषें चिंता जैसा तैसा ॥७॥ साक्षी तयापाशीं पूर्वीलकर्माच्या । बांधला सेवेच्या ऋणी देव ॥८॥ देव भोळा धांवे भक्ता पाठोवाठी । उच्चारितां कंठीं मागेंमागें ॥९॥ मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी । धांवे तो घरासी भाविकांच्या ॥१०॥