भजनी मालिका
← भजनांकडे परत

संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें घडे नाम उच्चारितां

sandhya karma dhyan jap tap anushthan | avaghen ghade nam uchcharitan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें घडे नाम उच्चारितां । न वेचे मोल कांहीं लागती न सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥१॥ ऐसें हे सार कां नेघेसी फुकाचें । काय तुझें वेचे मोल तया ॥ध्रु.॥ पुत्रस्नेहें शोक करी अजामेळ । तंव तो कृपाळ जवळी उभा । अनाथांच्या नाथें घातला विमानीं । नेला उचलूनि परलोका ॥२॥ अंतकाळ गणिका पक्षियाच्या छंदें । राम राम पद उच्चारिलें । तंव त्या दिनानाथा कृपा आली कैसी । त्यानें तियेसी वैकुंठासी नेलें ॥३॥ अवचिता नाम आलिया हे गती । चिंतितां चित्तीं जवळी असे । तुका म्हणे भावें स्मरा राम राम । कोण जाणे तये देशे ॥४॥