भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम म्हणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी

ram mhanatan kamakrodhanchen dahan | hoy abhiman deshadhadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राम म्हणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥१॥ राम म्हणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नास ही ॥ध्रु.॥ राम म्हणे जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधीं ॥२॥ राम म्हणतां यम शरणागत बापुडें । आढळ पद पुढें काय तेथें ॥३॥ राम म्हणतां धर्म घडती सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥४॥ राम म्हणतां म्हणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥५॥