भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वजन्मीं पाप केलें तें हें बहु विस्तारिलें

purvajanmin pap kelen ten hen bahu vistarilen

पूर्वजन्मीं पाप केलें तें हें बहु विस्तारिलें । विषयसुख नाशिवंत सेवितां तिमिर कोंदलें । चौर्‍यांशी लक्ष योनी फ़िरतां दु:ख भोगिलें । ज्ञान दृष्टि हारपली दोन्ही नेत्र आंधळे ॥१॥ धर्म जागो सदैवांचा जे बा परउपकारी । आंधळ्या दृष्टि देतो त्यांचे नाम मी उच्चारीं ॥२॥ संसार दु:खमूळ चहुंकडे इंगळ । विश्रांति नाहीं कोठें रात्रंदिवस तळमळ । कामक्रोधलोभशुनीं पाठीं लागलीं वोढाळ । कवणा शरण जाऊं आतां दृष्टि देईल निर्मळ ॥३॥ मातापिता बंधु बहिणी कोणी न पवती निर्वाणीं । इष्टमित्रसज्जनसखें हे तों सुखाची मांडणी । एकला मी दु:ख भोगीं कुंभपाक जाचणी । तेथें कोणी सोडविना एका सदगुरुवाचुनी ॥४॥ साधुसंत मायबाप तिहीं दिलें कृपादान । पंढरीये यात्रे नेलें घडलें चंद्रभागे स्नान । पुंडलिकें वैद्यराजें पूर्वी साधिलें साधन । वैकुंठीचें मूळपीठ डोळां घातले तें अंजन ॥५॥ कृष्णांजन एकवेळा डोळां घालितां अढळ । तिमिरदु:ख गेलें तुटलें भ्रांतिपडळ । श्रीगुरु निवृत्तिराजें मार्ग दाविला सोज्वळ । बापरखुमा-देविवरुविठ्ठल दिनाचा दयाळ ॥६॥