भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वदिशे भानु उगवला नळनी कमळणी

purvadishe bhanu ugavala nalani kamalani

पूर्वदिशे भानु उगवला नळनी कमळणी विकासु केला । उष्णकरु अस्तु जाला सीतकरु प्रवर्तला कमळणी संकोचु केलाग बाईये ॥१॥ पढियंते मानसीं बहुवसे । असे दुरी तें जवळीच वसे रया ॥२॥ दोलक्षीं सोम अंबरी । त्याचे गुण उमटती सागरीं । अंवसे कळाहीनु येरु दिसे अंधारीं । तैसा समंधु ये शरीरीं रया ॥३॥ गगनीं वोळली घनुचरें तेणें क्षितिवरी नाचती मयूरें । सोम शीतळपणें कळा मिरवी अमृत घेवों जाणती ते चकोर रया ॥४॥ वोळलीं स्वातीचीं अंबुटें तें तत्त्व झेलिती शुक्तिका संपुष्टें । येरें नक्षत्रें वरुषती निकटें काय जळ तयाचें वोखटें रया ॥५॥ चातकु चंद्रातें चिंतितु । तो तयाचे मनोरथ पुरवितु । बापरखुमादेविवरुविठ्ठलु तो मी सदां असे ह्रदयीं ध्यातु रया ॥६॥