भजनी मालिका
← भजनांकडे परत

पवित्र तें कुळ पावन तो देश

pavitra ten kul pavan to desh

पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरीचे दास घेती जन्म ॥१॥ कर्मधर्म त्याचे झाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥ वर्णअभिमानें कोण झाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥३॥ अंत्यजादि योनि तरल्या हरीभजनें । तयाचीं पुराणें भाट झालीं ॥३॥ वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥४॥ कबीर मोमीन लतिब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥५॥ काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरीचे पायीं ॥६॥ चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥७॥ नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥८॥ मैराळा जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥९॥ यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥१०॥ तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥११॥