भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरि पुण्यभूमी भीमा दक्षिणावाहिनी । तीर्थ हें चंद्रभागा महा पातकां धुनी

pandhari punyabhumi bhima dakshinavahini | tirtha hen chandrabhaga maha patakan dhuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरि पुण्यभूमी भीमा दक्षिणावाहिनी । तीर्थ हें चंद्रभागा महा पातकां धुनी । उतरलें वैकुंठमहासुख मेदिनी ॥१॥ जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा । आरती ओंवाळीन तुम्हां लक्ष्मीकांता ॥ध्रु.॥ नित्य नवा सोहळा हो महावाद्यांचे गजर । सन्मुख गरुड पारीं उभा जोडुनि कर । मंडितचतुर्भुजा कटीं मिरवती कर ॥२॥ हरीनाम कीर्तन हो आनंद महाद्वारीं । नाचती प्रेमसुखें नर तेथिंच्या नारी । जीवन्मुक्त लोक नित्य पाहाती हरी ॥३॥ आषाढी कार्तीकी हो गरुडटकयांचे भार । गर्जती नाम घोष महावैष्णववीर । पापासी रीग नाहीं असुर कांपती सुर ॥४॥ हें सुख पुंडलिकें कसें आणिलें बापें । निर्गुण साकारले आम्हांलागिं हें सोपें । म्हणोनि चरण धरोनि तुका राहिला सुखें ॥५॥