भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन

paha ho kalichen mahiman | asatyasi rijhalen jan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन। पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचे ॥१॥ ऐसें अधर्माचें बळ । लोक झकविले सकळ । केलें धर्माचें निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥ध्रु.॥ थोर या युगाचें आश्चर्य । ब्रम्हकर्म उत्तम सार । सांडूनियां द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥२॥ ऐसे यथार्थाचे अनर्थ । झाला बुडाला परमार्थ । नाहीं ऐसी झाली नीत । हा हा भूत पातलें ॥३॥ शांति क्षमा दया । भावभक्ती सित्क्रया । ठाव नाहीं सांगावया । सत्त्वधैर्य भंगिलें ॥४॥ राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरती कर्म । म्हणवितां रामराम । महा श्रम मानिती॥५॥ थेर भोरप्याचे विशीं । धांवती भूतें आविसा तैसीं । कथा पुराण म्हणतां सिसी । तिडीक उठी नक त्याची ॥६॥ विषयलोभासाठी । सवार्थेसीं प्राण साटी । परमार्थी पीठ मुठी । मागतां उठती सुनींसीं॥७॥ धनाढ्य देखोनि अनामिक । तयातें मनिती आवश्यक । अपमानिले वेदपाठक । शास्त्रज्ञ सात्त्विक संपन्न ॥८॥ पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी । सुनांचिया दासी । सासा झाल्या आंदण्या ॥९॥ खोटें झालें आली विंवसी । केली मर्यादा नाहींसी । भ्रतारें तीं भार्यासी । रंक तैसीं मानिती ॥१०॥ नमस्कारावया हरीदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा । पोटासाठी खौसा । वंदिती म्लेच्छाया॥११॥ बहुत पाप झलें उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ। अभक्ष भिक्षती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥१२॥ कैसें झालें नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न । विडे घेऊनि ब्राम्हण । अविंदवाणी वदताती ॥१३॥ कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदनें दासीचीं चुंबिती । सोवळ्याच्या स्फीती । जगीं मिरविती पवित्रता ॥१४॥ मद्यपानाची शिराणी । नवनीता न पुसे कोणी । केळवती व्यभिचारिणी । दैन्यवाणी पतिव्रता ॥१५॥ केवढी दोषाची सबळता। झाली पाहा हो भगवंता । पुण्य धुडावोनी संता । तीर्थां हरी आणिली ॥१६॥ भेणें मंद झाल्या मेघवृष्टि । आकांतली कांपे सृष्टि । देव रिगाले कपाटीं । आटाआटी प्रवर्तली ॥१७॥ अपीक धान्यें दिवसें दिवसें। गाई ह्मैसी चेवल्या रसें । नगरें दिसती उदासें । पिकले बहुवसें पाखांडें ॥१८॥ होम हरपलीं हवनें । यज्ञयाग अनुष्ठानें । जपतपादिसाधनें । आचरणें भ्रष्टलीं ॥१९॥ अठरा यातींचे व्यापार। करिती तस्कराई विप्र । सांडोनियां शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळीं पांघरती ॥२०॥ गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्रीं । अश्वाचियापरी । कुमारी विकिती वेदवक्ते ॥२१॥ वेदाध्ययनसंहितारुचि । भकांद्या करिती तयांची । आवडी पंडितांची । मुसाफावरी बैसली ॥२२॥ मुख्य सर्वोत्तम साधनें । तीं उच्छेदुनि केलीं दीनें । कुडीं कापटें महा मोहनें । मिरविताती दुर्जन ॥२३॥ कळाकुशळता चतुराई । तर्कवादी भेद निंदेठायीं । विधिनिषेधाचा वाही । एक ही ऐसीं नाडलीं ॥२४॥ जे संन्यासी तापसी ब्रम्हचारी । होतां वैरागी दिगांबर निस्पृही वैराग्यकारी । कामक्रोधें व्यापिले भारी। इच्छाकरीं न सुटती ॥२५॥ कैसें विनाशकाळाचें कौतुक । राजे झाले प्रजांचे अंतक । पिते पुत्र सहोदर । एकाएक शत्रुघातें वर्त्तती ॥२६॥ केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविलें अवघें जन । याती अठरा चाऱ्ही वर्ण । कर्दम करूनि विटाळले ॥२७॥ पूर्वी होतें भविष्य केलें । संतीं ते यथार्थ झालें । ऐकत होतों ते देखिलें ।प्रत्यक्ष लोचनीं ॥२८॥ आतां असो हें आघवें । गति नव्हे कळीमध्येंवागवरावें । देवासी भाकोनि करुणावें । वेगें स्मरावें अंतरीं ॥२९॥ अगा ये वैकुंठानायका । काय पाहातोसि या कौतुका । धांव कलीनें गांजिलें लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥३०॥