भजनी मालिका
← भजनांकडे परत

ॐ नमो भगवते वासुदेवाय

om namo bhagavate vasudevay

ॐ नमो भगवते वासुदेवाय । वोडियाणा बंदु घालुनिया देहुडा लागसील पावो । वोतप्रोत सांडूनि मना धरिसि अहंभावो । ओंकारबिंदुचा न पवसि ठावो । वोळगे वोळगे कृष्णद्वारावतिये रावो ॥१॥ ओं नमो भगवते वासुदेवाय । द्वादशक्षरि मंत्रु न जपसि काह्या ॥ध्रु०॥ नागिणि उत्साहो नवहिद्वारें निरोधुन । नाडित्रयामाजि सुषुम्नासंचरण । न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन । नरहरि चिंतने अहर्निशि मुक्तिस्थान ॥२॥ मोडिसि करचरण तेणें पावसि अंत समो । मोहो तृष्णा न तुटे ब्रह्मविद्या केवि गमो । मोठा हा अन्यावो जे हरिचरणीं नाहीं नामो । मोक्षाची चाड तरी मुकुंदीं मन रमो ॥३॥ भांबावसी झणे हें शरीर कर्दळीस्तंभ । भस्म कृमि विष्ठा उभे आहे तों सुशोभ । भाविता किटकी जाली भृंगी तिया क्रमिले नभ । भावें भक्ति सुलभ वोळगा गा पद्मनाभ ॥४॥ गति मती इंद्रियें जव आहेती समयोग । गणित आयुष्य न पुरें जंव हे न नचे भंग । गमला हाचि योग जे अनुसरावा श्रीरंग ॥ गरुडध्वज प्रसादें निस्तरिजे भवतरंग ॥५॥ वनिं सिंह वसतां गजीं मदु केवीं धरावा । वन्हिदग्धबीज त्यासि अंकुर केवि फुटावा । वज्रपाणी कोपलिया गिरि उदधी केवि लंघावा । वदनीं हरि न उच्चारी तेणें संसार केंवि भुंजावा ॥६॥ तेज नयनींचा भानु जेणें तेजे मीनले ते । त्याचे मानसिचा चंद्रमा तो सिंपोते अमृतें । त्याचे नाभिकमळीं ब्रह्मा तेणें सृजिलीं सकळहीं भूतें । तें विराटस्वरुप वोळखावें विष्णुभक्तें ॥७॥ वाताघातें फुटे गगनीं मेघाचा मेळावा । वारिबिंदु पद्यिणिपत्रीं केवी हो ठेवावा । वानराच्या हातीं चिंतामणी केवि द्यावा । वासुदेव चिंतनें तोचि कल्मशा उठावा ॥८॥ सूक्ष्म स्थूळ भूतें चाळिताहे परमहंसु । शूळपाणी देवोदेवि जयाचारे अंशु । शुभाशुभीं कर्मी न करि नामाचा आळसु । सुखें निरंतरी ध्याई ध्याई ह्रषिकेशु ॥९॥ देव होऊनि उदार भक्तां देतो अमरपदें । देतां न ह्मणे सानाथोर वैरियासि तेचि दे । देहे सार्थक अंति वासुदेव द्वय छंदे । देखा आजामेळ उध्दरिला नामें येणें मुकुंदें ॥१०॥ वाडा सायासि मनुष्यजन्म पावावा । वियाला पुरुषार्थ तो कां वाया दवडावा । वाचामनें करुनि मुरारी वोळगावा । व्रतें एकादशी करुनि परलोक ठाकावा ॥११॥ या धनाचा न धरी विश्वास । जैशी तरुवर छाया । यातायाती न चुकें तरी हे भोगसिल काह्या । या हरिभजनेविण तुझें जन्म जातें वायां । यालागी वैकुंठनाथाच्या तूं चिंती पा रे पायां ॥१२॥ इहींच द्वादशाक्षरीं ध्रुव अढळ पद पावला । प्रल्हाद रक्षिला अग्निशस्त्रापासुनि जळा । बापरखुमादेविवरु विठ्ठलु तुह्मी ध्यारे वेळोवेळां । तो कळिकाळापासुनी सोडविल अवलीळा ॥१३॥