भजनी मालिका
← भजनांकडे परत

मना वाटे तैसीं बोलिलों वचनें । केली धिटपणें सलगी देवा

mana vate taisin bolilon vachanen | keli dhitapanen salagi deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मना वाटे तैसीं बोलिलों वचनें । केली धिटपणें सलगी देवा ॥१॥ वाणी नाहीं शुद्ध याति एक ठाव । भक्ति नेणें भाव नाहीं मनीं ॥२॥ नाहीं झालें ज्ञान पाहिलें अक्षर । मानी जैसें थोर थोरी नाहीं ॥३॥ नाहीं मनीं लाज धरिली आशंका । नाहीं भ्यालों लोकां चतुरांसि ॥४॥ चतुरांच्या राया मी तुझें अंकित । झालों शरणागत देवदेवा ॥५॥ देवा आतां करीं सरतीं हीं वचनें । तुझ्या कृपादानें बोलिलों तीं ॥६॥ तुझें देणें तुझ्या समर्पूनि पायीं । जालों उतरायी पांडुरंगा ॥७॥ रंकाहुनि रंक दास मी दासांचें । सामर्थ्य हें कैचें बोलावया ॥८॥ बोलावया पुरे वाचा माझी कायी । तुका म्हणे पायीं ठाव द्यावा ॥९॥