भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग पंढरीराणा बोलतसे वाणी

mag pandharirana bolatase vani

रचनाकार: संत बंका · अभंग
मग पंढरीराणा बोलतसे वाणी । आलों मी दुरोनी येचि मार्गे ॥१॥ क्षुधा मज बहु लागली साजणी । देई कांही आणोनी फराळासी ॥२॥ येरी म्हणे आम्ही नीच याती महार । कैसा हा विचार करूं आतां ॥३॥ येरू म्हणे माझा जाऊं पाहे प्राण । यातीसी कारण नाहीं मज ॥४॥ कांही तरी अन्न असेल शिळे मिळें । देई येची वेळे लवकरी ॥५॥ वंका म्हणे ऐसे लाघव श्रीहरी । करोनी पसरी हात पुढें ॥६॥