भजनी मालिका
← भजनांकडे परत

मदनमूर्ति विश्वीं अळंकारिली । ते डोळ्यां असुमाय जाली

madanamurti vishvin alankarili | te dolyan asumay jali

मदनमूर्ति विश्वीं अळंकारिली । ते डोळ्यां असुमाय जाली । पाहतां मनाची वृत्ति नुपुरे तेथिची सोय । तेथें भरोनि वोसंडिली गे माये ॥१॥ अभिनव रुप कैसें मना अगोचर अरुप रुपासि आलें । तें हें कल्पद्रुमातळीं ठाण मांडूनि देहुडें । तेणें आनंदघनें निवविलेंगे माये ॥ध्रु०॥ चिदानंदाची मांदुस किंचिदघन चिदाकाश । तेज: पुंज प्रकाश चरणीं शोभा ॥ निडारलें दृष्टि पाहतां रुपाचा एकवळा । कैसा साकारे सोहळा भोगीतसे गे माये ॥२॥ सकळ तीर्थ अर्तिलीं । तीं ऋषिवृंदें घेऊनि बैसलीं । पावन झालीं । चरणांगुष्ठीं ॥ वाकी तोडरु गजरीं । गर्जतसे नानापरी तो श्रुतिनादु अंबरीं । सांठवलागे माये ॥३॥ उपनिषदाचा गाभा । परी देहुडा पाउलीं उभा । जानुजघनींच्या प्रभा । नभ धवळलें ॥ सुरंग सोनसळा । वरी वेढिला पिंवळा । त्यावरी गाठियला मेखळा । रत्नखचितगे माये ॥४॥ हा जगडंबरु जगदाभासु । कीं ठसावला आभासु । नाभिकमळीं प्रकाशु । चतुरानना ॥ पाहता तेथींची हाव । मना न पुरे तेथींची थाव । म्हणउनि सगुण ध्यान । करी तुझेगे माये ॥५॥ ब्रह्मांडाचिया कोडी । रोमरंध्रीं उतरंडी । मदन सांडुनिया प्रौढी । उदरा आला ॥ सुघटित वक्षस्थळ । निरोपम केवळ । वरी पदयुगुळ । द्विजोत्तमगे माये ॥६॥ चहूं पुरुषार्थांचें साधन । तोचि आयुधें मंडन । बाहीं बाहुवटे मंडन । मंडना आलें ॥ वीर कंकण मनगटीं । कांडोवांडीं मुद्रा दाटी । कैसा अलोहित नखें बोटीं ।वेणु वाहे वो माये ॥७॥ ब्रह्म ऐसें धेनु आतला । कीं सुधारसु मुराला । तोचि नादु सुस्वर आला । पावया छंदें ॥ अधरीचें अमृत । पिकलेंसे ब्रह्मरस । तेणें जाला सौरसु । गोपिजनागे माये ॥८॥ नयनींचे तारे । दो पक्षीं प्रेम पुरे । द्वैताद्वैत एकसरें । ठकलें ठेलें ॥ कुंडलाचिये दीप्ती । लोपला गभस्ती । सुखस्वरुपाची शांति । येणे सुखेंगे माये ॥९॥ आतां पाहतां पाहतया दृष्टी नपुरे । ध्यातां मनचि नुरे । आंत बाहेरी पुरे । व्यपूनि ठेला ॥ मावळलिया दृष्टि पाहातां देखणें ठसावलें । निर्गुण गुणासि आलें । सदोदित गे माये ॥१०॥ आतां हा केंवि पाहावा । पाहातयेचि दृष्टि । मन मनेंचि दिधली मिठी । तेथील ते गोडी रुपासी आली ॥ म्हणती निवृत्ति । ज्ञानदेवा पाहे चित्तीं । आतां जागृतीच्या अंती । सुखशातिं रया ॥११॥