भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं

khelimmelin ale ghara gopinath | gopalansahit matepashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥१॥ मातेपाशीं एक नवल सांगती । झाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥ ओवाळिलें तिनें करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसि ॥३॥ पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥४॥ कवतुका कानीं आइकतां त्यांचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥५॥ नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥६॥ तेव्हां कवतुक कळों आलें कांहीं । हळुहळु दोहीं मायबापां ॥७॥ हळुहळु त्यांचें पुण्य झालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें ॥८॥ तिमिर हें तेथें राहों शके कैसें । जालियां प्रकाशें गोविंदाच्या ॥९॥ दावी तुका म्हणे देव ज्या आपणा । पालटे तें क्षणामाजी एका ॥१०॥