भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळ मांडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे

khel mandiyela valavantin ghai | nachati vaishnav bhai re | krodh abhiman kela pavatani | ek eka lagatil payin re

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खेळ मांडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥ नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी रे । कळिकाळावरी घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥ध्रु.॥ गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां रे । टाळ मृदंग घाई पुष्पवरुषाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥ लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां रे । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सद्धिसाधकां रे ॥३॥ वर्णाभिमान विसरली याति । एकएकां लोटांगणीं जाती रे । निर्मळ चित्तें झालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥४॥ होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे ॥५॥