भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय खावें आतां कोणीकडे जावें । गांवांत राहावें कोण्या बळें

kay khaven atan konikade javen | ganvant rahaven konya balen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय खावें आतां कोणीकडे जावें । गांवांत राहावें कोण्या बळें ॥१॥ कोपला पाटील गांविचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज ॥ध्रु.॥ आतां येणें चवी सांडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणांत ॥२॥ भल्या लोकीं यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥३॥ तुका म्हणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥४॥