भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीयेवेळीं चोरूनियां नेलीं वत्सें । तयालागीं तैसें होणें लागे

jiyevelin choruniyan nelin vatsen | tayalagin taisen honen lage

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीयेवेळीं चोरूनियां नेलीं वत्सें । तयालागीं तैसें होणें लागे ॥१॥ लागे दोहीं ठायी करावें पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥ माय झाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरीं वत्सें जीचीं तैसा झाला ॥३॥ झाला तैसा जैसे घरिंचे गोपाळ । आणिक सकळ मोहरी पांवे ॥४॥ मोहरी पांवे सिंगें वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रम्हादिकीं ॥५॥ ब्रम्हांदिकां सुख स्वपनीं ही नाहीं । तैसें दोहीं ठायीं वोसंडलें ॥६॥ वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आईं तैसा जाला ॥७॥ लाघव कळलें ब्रम्हयासी याचें । परब्रम्ह साचें अवतरलें ॥८॥ तरले हे जन सकळ ही आतां । ऐसें तो विधाता बोलियेला ॥९॥ लागला हे स्तुती करूं अनंताची । चतुर्मुख वाची भक्ती स्तोत्रें ॥१०॥ भक्तिकाजें देवें केला अवतार । पृथ्वीचा भार फेडावया ॥११॥ पृथिवी दाटीली होती या असुरीं । नासाहावे वरीभार तये ॥१२॥ तया काकुलती आपल्या दासांची । तयालागीं वेंची सर्वस्व ही ॥१३॥ स्वहित दासांचें करावयालागीं । अव्यक्त हें जगीं व्यक्ती आलें ॥१४॥ लेखा कोण करी यांचिया पुण्याचा । जयांसवें वाचा बोले हरी ॥१५॥ हरी नाममात्रें पातकांच्या रासी । तो आला घरासि गौळियांच्या ॥१६॥ गौळिये अवघीं झालीं कृष्णमय । नामें लोकत्रय तरतील ॥१७॥ तरतील नामें कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशीं होईल पाप ॥१८॥ पाप ऐसें नाहीं कृष्णनामें राहे । धन्य तोचि पाहे कृष्णमुख ॥१९॥ मुख माझें काय जो मी वर्णू पार । मग नमस्कार घाली ब्रम्हा ॥२०॥ ब्रम्हा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासि हाचि देव ॥२१॥ देव चि अवगा झाला से सकळ । गाईं हा गोपाळ वत्सें तेथें ॥२२॥ तेथें पाहाणें जें आणीक दुसरें । मूर्ख त्या अंतरें दुजा नाहीं ॥२३॥ दुजा भाव तुका म्हणे जया चित्ती । रवरव भोगिती कुंभपाक ॥२४॥