भजनी मालिका
← भजनांकडे परत

जननिया बाळका रे घातलें पाळणा । पंचतत्त्वी जोडियेल्या वारतिया चहूं कोणा । अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनि हातीं भाव दावी खेळणा

jananiya balaka re ghatalen palana | panchatattvi jodiyelya varatiya chahun kona | akhand jadiyelya taya dhal angana | vaikhari dharuni hatin bhav davi khelana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जननिया बाळका रे घातलें पाळणा । पंचतत्त्वी जोडियेल्या वारतिया चहूं कोणा । अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनि हातीं भाव दावी खेळणा ॥१॥ निजीं रे निजीं आतां । म्हणोनि परिये दे माता । खेळतां कष्टलासी बाळा तूं रे नेणतां । निजीं रे निजीं आतां ॥ध्रु.॥ खेळतां बाहेरि रे मुला लोकांच्या सवें । बागुल काळतोंडा नाहीं नेतो तें ठावें । खेळतां दुश्चित्ता रे देखोनि तें न्यावें । म्हणोनि सांगें तुज शीघ्र वचन पाळावें॥२॥ संचित मागें तुज शुद्ध होतें सांगाती । तेणें तुज वांचविलें वेरझारिया हातीं । आणीक नेली मागें काय जाणों तीं किती । आलासि येथवरी थोरपुण्यें बहुतीं ॥३॥ खेळतां शुक देवा तो रे लागला पाठीं । लपाला वरुषें बारा तिये मातेचे पोटीं । रिघतां बाहेरि रे पळे घेऊनि कासोटी । ते चि परी जाली स्वामी भेणें रिघें कपाटीं ॥४॥ खेळतां चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिलासे अग्नीमाजी पाव जळत एक। भरलासे कांप अंगीं सुख नाठवें दुःख। आप पर तें ही नाहीं देहभाव सकिळक ॥५॥ सिभ्रीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो न भे तया मास कापिलें हातीं । टाकिलें तयावरी खुणें गोविला अंतीं । पावला मायबाप हिरोन घेतला हातीं ॥६॥ बांधलें अजामेळा वेश्यागणीका कैसी । मारिली हाक धाकें कळलें मायबापासी। घातली धांव नेटें वेगीं पावला त्यासी । हिरोनि नेलीं दोघें आपणयां तीं पासी ॥७॥ धरूनी आठवू रे बाळा राहें निश्चळ । खेळतां दुश्चिता रे नको जाऊं बरळ। टोंकताहे तुजलागीं दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवूं रे नेत्रीं घालीं पडळ ॥८॥ ऐसी तीं कृपावंतें बाळा मोहिलें चित्त । सुस्वरें कंठ गाय मधुर आणि संगीत । तेणें तें चि चित्त राहे होऊनियां निवांत । पावती तुका म्हणे नाहीं विश्वास तो घात ॥९॥