भजनी मालिका
← भजनांकडे परत

जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधीं । आवडी हे विधि । निषेधींचि चांगली

jalo majhi aisi buddhi | maj ghali tujamadhin | avadi he vidhi | nishedhinchi changali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधीं । आवडी हे विधि । निषेधींचि चांगली ॥१॥ तूं स्वामी मी सेवक । उंच पद निंच एक । ऐसें करावें कौतुक । नको करूं खंडणा ॥ध्रु.॥ जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोक्ता तो निराळा । तेणें गोडी निवडिली ॥२॥ हिरा शोभला कोंदणें । अळंकारीं मिरवे सोनें । एक असतां तेणें । काय दुजें जाणावें ॥३॥ उष्णें छाये सुख वाटे। बाळें माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥४॥ तुका म्हणे हित । हें चि मानी माझें चित्त । नव्हे आतां मुक्त । ऐसा जाला भरवसा ॥५॥