भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगदिश जगदिश तुज म्हणती । परि या जनामाजी असशील युक्ती

jagadish jagadish tuj mhanati | pari ya janamaji asashil yukti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जगदिश जगदिश तुज म्हणती । परि या जनामाजी असशील युक्ती । पुण्यपापविरहित सकळां अधिपति । दृष्टा परि नळणी अलिप्त गति ॥१॥ जय देव जय देव जय पंढरिनाथा । श्रीपंढरिनाथा । नुरे पाप विठ्ठल म्हणतां सर्वथा ॥ध्रु.॥ आगम निगम तुज नेणती कोणी । परि तूं भाव भक्ती जवळी च दोन्ही । नेणतां विधियुक्त राते पूजेनी । न माये ब्रम्हांडीं संपुष्टशयनीं ॥२॥ असुरां काळ भासे विक्राळ पुढें । पसरी मुखएक चावितो धुडें । भक्त शरणागता चाले तो पुढें । दावी वाट जाऊ नेदी वांकडें ॥३॥ एकाएकीं बहु विस्तरला सुखें । खेळे त्याची लीळा तोचि कवतुकें। तेथें नरनारी कवण बाळकें । काय पापपुण्य कवण सुखदुःखें ॥४॥ सकळा वर्मां तूं चि जाणशी एक । बद्ध मोक्ष प्राप्त आणि सुखदुःख । जाणों म्हणतां तुज टकलीं बहुतेकें । तुका म्हणे शरण आलों मज राखें ॥५॥