भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो

govind bhratar govind mulahari | namen bhed pari ek chi to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो ॥१॥ एकाचीं च नामें ठेवियेलीं दोनी । कल्पितील मनीं यावें जावें ॥२॥ जावें यावें तिहीं घरचिया घरीं । तेथिची सिदोरी तेथें न्यावी ॥३॥ विचारितां दिसे येणें जाणें खोटें । दाविती गोमटें लोका ऐसें ॥४॥ लोक करूनियां साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥५॥ लटिकीं करिती मंगळदायकें । लटिकीं च एकें एकां व्याही ॥६॥ व्याही भाईं हरी सोयरा जावायी । अवघियांच्या ठायीं केला एक ॥७॥ एकासि च पावे जें कांहीं करिती । उपचार संपत्ति नाना भोग ॥८॥ भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाईं ॥९॥ लटिका च त्यांणीं केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥१०॥ त्यांणीं मृत्तिकेचें करूनि अवघें । खेळतील दोघें पुरुषनारी ॥११॥ पुरुषनारी त्यांणीं ठेवियेलीं नावें । कवतुकभावें विचरती ॥१२॥ विचरती जैसे साच भावें लोक । तैसें नाहीं सुख खेळती त्या ॥१३॥ यांणीं जाणितलें आपआपणया । लटिकें हें वांयां खेळतों तें ॥१४॥ खेळतों ते आम्हीं नव्हों नारीनर । म्हणोनि विकार नाहीं तयां ॥१५॥ तया ठावें आहे आम्ही अवघीं एक । म्हणोनि निःशंक खेळतील ॥१६॥ तयां ठावें नाहीं हरीचिया गुणें । आम्ही कोणकोणें काय खेळों ॥१७॥ काय खातों आम्ही कासया सांगातें । कैसें हें लागतें नेणों मुखी ॥१८॥ मुखीं चवी नाहीं वरी अंगीं लाज । वरणा याती काज न धरिती ॥१९॥ धरितील कांहीं संकोच त्या मना । हांसतां या जना नाइकती ॥२०॥ नाइकती बोल आणिकांचे कानीं । हरी चित्ती मनीं बैसलासे ॥२१॥ बैसलासे हरी जयांचिये चित्ती । तयां नावडती मायबापें ॥२२॥ मायबापें त्यांचीं नेती पाचारुनि । बळें परि मनीं हरी वसे ॥२३॥ वसतील बाळा आपलाले घरीं । ध्यान त्या अंतरीं गोविंदाचें ॥२४॥ गोविंदाचें ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती ॥२५॥ न बोलती निजलिया हरीविण । जागृति सपन एक झालें ॥२६॥ एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागीं जैसा ॥२७॥ जैसा ज्याचा भाव घेतला त्यांपरी । तुका म्हणे हरी बाळलीला ॥२८॥