भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोकुळीं कमळ विस्तारलें साचें ध्यान श्रीधराचें करावया

gokulin kamal vistaralen sachen dhyan shridharachen karavaya

गोकुळीं कमळ विस्तारलें साचें ध्यान श्रीधराचें करावया ॥ यमुनेच्या पाबळीं मूर्ति देखिली सांवळी । चिदाकांशींची वोतली प्रेमतनुगे माये ॥१॥ आवडींचें वालभ ब्रह्म पुंजाळलें । गोपवेषें गाई राखे । कांबळीची बुंथी घेऊनि कल्प द्रुमातळीं । त्रिभंगी ठाण मांडियलेंगे माये ॥ध्रु०॥ योगमायेचनि विलासे उभा देहुडा पाउलीं । तेथे दीप्ति जे उदेली तेजाकारें अंगुष्ठीं अगुष्ठीं स्थापियेलें मूळपीठ । सुनीळनभाचेनि काळीवटे अंगोळियागे माये ॥२॥ शेष गुढारी विसंचला किं भूमि पावो ठेविला । तोचि विन्यस्त उभारला तेज:पुंज ॥ कुंकमपिंजरिचेनि सळे मापर्वती रातेत्पळें । तळवांचे रंग बाहळें पाउलीं श्र्लाघेगे माये ॥३॥ चरणकमळीं कमळा कैसी विराजली बाळा । तेथें जाला एकवळा ये कमळीं कमळा ॥ ध्वजवज्र अंकुशरेखा चरणीं वोळली पीयूष । नखे सरळीं देखा काळेपणाचेनिगे माये ॥४॥ घोटीं सुनीळ निरावकाशें काश पाहतां भासलासे । जानुजघन प्रकाशे नभ ढवळलें ॥ कासे कसिला सोनसळा खवे आला मध्यस्थळा । रत्नजडित मेखळा शोभतसेगे माये ॥५॥ द्वितीय कमळीं प्रजापती कीं रोमराजी झळकती । तेथें उपनली दीप्ति काळी त्रिवळीची ॥ उदरवक्षस्थळ द्विजपद निर्मळ । स्तनचंद्र पोकळी ढिसाळ काळिमा जैसीगे माये ॥६॥ उदधीचेनी प्रेमसळें आपाद वैजयंती माळे । वरी शोभताती सोहळे सगुणाचे ॥ दशनदीप्ति झळाळी रत्नकिळा मागों आली । दिसे हनुवटी बुजाली प्रभेचेनिगे माये ॥७॥ प्रणवाचा मरिगळा पूजनासि आला भाळा । तुर्येसहित त्रिपुंड्र टिळा अर्ध ऊर्ध्व मात्रीं ॥ अभिनव महाकारणी । पवनपंचकाचीं खेवणीं । कुंडलें पेरावणी कर्णी ढाळ देतीगे माये ॥८॥ माथां मोर पिसावेठी गंडस्थळीं पडे दीप्ति । स्वयें विस्मित श्रीपती तेज:पुंजगे माये ॥ तरुघोंस खोंविले शिरीं वेणु ठेऊनि अधरीं । नंदरायाचा खिल्लारी वोज काय सांगोंगे माये ॥९॥ सप्तरंध्रीं सप्तस्वर चाळी अंगोळिया मनोहर । मुद्रिका शोभती साकार रत्नजडितगे माये ॥ तिया वेणुचिया किळा । गोपि वेधल्या सकळा । अवघिया जाल्या पै काळ्या कृष्णरुपेंगे माये ॥१०॥ ऐसा नटनाट्य वेषधारी सवे संवगडे वारिधारी । कैसा त्रिभंग कुसुरी उभा असेगे माये ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु सुखाचें निधान तें म्यां ह्रदयीं संपूर्ण सांठविलेंगे माये ॥११॥