भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाईंन ओंविया पंढरिचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग

gainn onviya pandharicha dev | amucha to jiv pandurang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गाईंन ओंविया पंढरिचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग ॥१॥ रंगलें हें चित्त माझें तया पायीं । म्हणउनि घेई हाचि लाहो ॥२॥ लाहो करीन मी हाचि संवसारीं । राम कृष्ण हरी नारायण ॥३॥ नारायण नाम चालितां तुकासी । न येती या रासी तपतीर्थे ॥४॥ तीर्थे माथां रज वंदिती संतांचे । जे गाती हरीचे गुणवाद ॥५॥ गुणवाद ज्याचे गातां पूज्य झाले । बडिवार बोले कोण त्याचा ॥६॥ त्याचा नाहीं पार कळला वेदांसी । आणीक ही ॠषि विचारितां ॥७॥ विचारितां तैसा होय त्यांच्या भावें । निजसुख ठावें नाहीं कोणा ॥८॥ कोणा कवतुक न कळे हे माव । निजलिया जिव करी धंदा ॥९॥ करुनि कवतुक खेळे हीच लीळा । व्यापूनि वेगळा पाहातसे ॥१०॥ सेवटीं आपण एकला चि खरा । सोंग हा पसारा नट केला ॥११॥ लावियेलें चाळा मीपणें हें जन । भोग-तया कोण भोगवितो ॥१२॥ विषयीं गुंतलीं विसरलीं तुज । कन्या पुत्र भाज धनलोभे ॥१३॥ लोभें गिळी फांसा आमिषाच्या आशा । सांपडोनि मासा तळमळी ॥१४॥ तळमळ याची तरीच शमेल । जरी हा विठ्ठल आठविती ॥१५॥ आठवे तरी देव संतांच्या सांगातें । किंवा हें संचित जन्मांतरें ॥१६॥ जन्मांतरें तीन भोगितां कळती । केलें तें पावती करितां पुढें ॥१७॥ पुढें जाणोनियां करावें संचित । पुजावे अतीत देव द्विज ॥१८॥ जन्म तुटे ऐसें नव्हे तुम्हां जना । पुढिल्या पावना धर्म करा ॥१९॥ करा जप तप अनुष्ठान याग । संतीं जे मारग स्थापियेलें ॥२०॥ लावियेलीं कर्मी शुद्ध आचरणी । कोणा एका जन्मी केले पावे ॥२१॥ पावले सत्वर निष्काम उद्धार। जिंकिली अपार वासना हे ॥२२॥ वासनेचें मूळ छेदिल्या वांचून । तरलोसें कोणी न म्हणावें ॥२३॥ न म्हणावें झालो पंडित वाचक । करूंनि मंत्रघोष अक्षरांचा ॥२४॥ चालविलीं एकें ते चि आवडीनें । लोक दंभमानें देहसुखें ॥२५॥ सुख तरीच घडे भजनाचें सार । वाचे निरंतर रामनाम ॥२६॥ राम हा उच्चार तरीच बैसे वाचे । अनंता जन्माचें पुण्य होय ॥२७॥ पुण्य ऐसें काय रामनामापुढें । काय ते बापुडे यागयज्ञ ॥२८॥ यागयज्ञ तप संसार दायकें । न सुटे एक नामेंविण ॥२९॥ नामेंविण भवसिंधु पावे पार । अइसा विचार नाहीं दुजा ॥३०॥ जाणती हे भक्तराज महामुनि । नाम सुखधणी अमृताची ॥३१॥ अमृताचें सार निजतत्व बीज । गुह्याचें तें गुज रामनाम ॥३२॥ नामें असंख्यात तारिले अपार । पुराणीं हें सार प्रसिद्ध हे ॥३३॥ हें चि सुख आम्ही घेऊं सर्वकाळ । करूनि निर्मळ हरीकथा ॥३४॥ कथाकाळीं लागे सकळा समाधि । तात्काळ हे बुद्धी दुष्ट नासे ॥३५॥ नासे लोभ मोहो आशा तृष्णा माया । गातां गुण तया विठोबाचे ॥३६॥ विठोबाचे गुण मज आवडती । आणीक हे चित्ती न लगे कांहीं ॥३७॥ कांहीं कोणी नका सांगों हे उपाव । माझा मनीं भाव नाहीं दुजा ॥३८॥ जाणोनियां आम्ही दिला जीवभाव । दृढ याचे पाव धरियेले ॥३९॥ धरियेले आतां न सोडीं जीवेंसी । केला हा सेवेशीं निरधार ॥४०॥ निरधारे आंम्ही राहिलों ये नेटीं । संवसारतुटी करूनियां ॥४१॥ येणें अंगीकार केला पांडुरंगें । रंगविला रंगें आपुलिया ॥४२॥ आपुली पाखर घालुनियां वरी । आम्हांसी तो करी यत्न देव ॥४३॥ देव राखे तया आणिकांचें काय । करितां उपाय चाले तेथें ॥४४॥ तेथें नाहीं रिघ कळिकाळासी येतां । दास म्हणवितां विठोबाचे ॥४५॥ विठोबाचे आम्ही लाडिके डिंगर । कांपती असुर काळ धाकें ॥४६॥ धाक तिहीं लोकीं जयाचा दरारा । स्मरण हें करा त्याचें तुम्ही ॥४७॥ तुम्ही निदसुरे नका राहूं कोणी । चुकवा जाचणी गर्भवास ॥४८॥ गर्भवासदुःख यमाचें दंडणें । थोर होय शीण येतां जातां ॥४९॥ तान भूक पीडा जीतां ते आगात । मेल्या यमदूत जाच करिती ॥५०॥ जाच करिती हे म्हणसी कोणाठावें । नरकीं कौरवें बुडी दिली ॥५१॥ बुडी दिली कुंभपाकीं दुर्योधनें । दाविना लाजेनें मुख धर्मा ॥५२॥ धर्म हा कृपाळू आलासे जवळी । बैसला पाताळीं वरी नये ॥५३॥ न ये वरी कांहीं करितां उपाव । भोगवितो देव त्याचे त्यासी ॥५४॥ त्यांसी अभिमान गर्व या देहाचा । नुच्चारिती वाचा नारायण ॥५५॥ नारायण जे विसरती संवसारीं । तयासी अघोरीं वास सत्य ॥५६॥ सत्य मानूनियां संतांच्या वचना । जा रे नारायणा शरण तुम्ही ॥५७॥ तुम्ही मानूं नका कोणी हा विश्वास । पुत्र पत्नी आस धन वित्त ॥५८॥ धन वित्त लोभ माया मोहपाश । मांडियले फांसे यमदूतीं ॥५९॥ दूतीं याच्या मुखा केलेंसे कुडण । वाचे नारायण येऊं नेदी ॥६०॥ नेदी शुद्धबुद्धी आतळों चित्तीसी । नाना कर्मे त्यासी दुरावती ॥६१॥ दुराविलीं एकें जाणतींच फार । निंदा अहंकार वादभेद ॥६२॥ वाद भेद निंदा हे फंद काळाचें । गोवितील वाचे रिकामिकें ॥६३॥ रिकामिक देवा होय नव्हे मना । चिंतेचिये घाणा जुंपिजेसी ॥६४॥ सेवटीं हे गळा लावुनियां दोरी । सांभाळ ये करी वासनेचा ॥६५॥ वासनेचा संग होय अंतकाळीं । तरी तपोबळी जन्म धरी ॥६६॥ धरूनियां देव राहतील चित्ती । आधींलिया गती आठवाया ॥६७॥ आठवावा देव मरणाचे काळीं । म्हणउनि बळी जीव दिले ॥६८॥ दिले टाकूनियां भोग ॠषेश्वरीं । खाती वनांतरीं कंदमूळें ॥६९॥ मुळें सुखाचिया देव अंतरला । अल्पासाठी गेला अधोगती ॥७०॥ गति हे उत्तम व्हावया उपाव । आहे धरा पाव विठोबाचे ॥७१॥ विठोबाचे पायीं राहिलिया भावें । न लगे कोठें जावें वनांतरा ॥७२॥ तरती दुबळीं विठोबाच्या नांवें । संचित ज्या सवें नाहीं शुद्ध ॥७३॥ शुद्ध तरायाचे काय तें नवल । म्हणतां विठ्ठल वेळोवेळां ॥७४॥ वेळाकाळ नाहीं कवणाचे हातीं । न कळे हे गति भविष्याची ॥७५॥ भविष्य न सुटे भोगिल्यावांचूनि । संचित जाणोनि शुद्ध करा ॥७६॥ करावे सायास आपुल्या हिताचे । येथें आलियाचे मनुष्यपण ॥७७॥ मनुष्यपण तरी साधी नारायण । नाहीं तरी हीन पशुहूनी ॥७८॥ पशु पापपुण्य काय ते जाणती । मनुष्या या गति ठाउकिया ॥७९॥ ठाउकें हें असे पाप पुण्य लोका । देखती ते एकां भोगितिया ॥८०॥ भोगतील एक दुःख संवसारीं । काय सांगों परी वेगळाल्या ॥८१॥ ल्यावें खावें बरें असावें सदैव । हे चि करी हांव संवसारीं ॥८२॥ संवसारें जन गिळिले सकळ । भोगवितो फळ गर्भवास ॥८३॥ वासनेची मूळ छेदिल्यावांचून । नव्हे या खंडण गर्भवासा ॥८४॥ सायास केलियावांचुनि तें नाही । भविष्यावरी काहीं घालूं नये ॥८५॥ न ये बळें धड घालूं कांट्यावरी । जाये जीवें धरी सर्प हातीं ॥८६॥ हातीं आहे हित करील तयासी । म्हणउनि ॠषीं सांगितलें ॥८७॥ सांगीतले या लोकां फजित करूनि । आपण जे कोणी तरले ते ॥८८॥ तेणें वाळवंटीं उभारिले कर । कृपेचा सागर पांडुरंग ॥८९॥ गंगाचरणीं करी पातकांची धुनी । पाउलें तीं मनीं चिंतिलिया ॥९०॥ चिंतनें जयाच्या तरती पाषाण । उद्धरी चरण लावूनियां ॥९१॥ लावूनियां टाळी नलगे बैसावें । प्रेमसुख घ्यावें संतसंगें ॥९२॥ संतसंगें कथा करावें कीर्तन । सुखाचें साधन रामराम ॥९३॥ मग कोठें देव जाऊं न सके दुरी । बैसोनि भीतरी कंठीं राहे ॥९४॥ राहे व्यापुनियां सकळ शरीर । आपुला विसर पडों नेदी ॥९५॥ नेदी दुःख देखों आपुलिया दासा । वारी गर्भवासा यमदूता ॥९६॥ तहान भूक त्यासी वाहों नेदी चिंता । दुश्चिंत हे घेतां नाम होती ॥९७॥ होती जीव त्यांचे सकळ ही जंत । परि ते अंकित संचिताचे ॥९८॥ चेवले जे कोणी देह अभिमानें । त्यांसी नारायणें कृपा केली ॥९९॥ कृपाळू हा देव अनाथा कोंवसा । आम्हीं त्याच्या आशा लागलोंसों ॥१००॥ लावियेले आसे येणें पांडुरंगें । तुका म्हणे संगें संतांचिया ॥१०१॥