भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोळ्याची निशी कोणें काढिली

dolyachi nishi konen kadhili

डोळ्याची निशी कोणें काढिली । की रविबिंबा हारीं कोणे आणिली ॥ कीं काळिमा पाठी प्रकाशु तरि चंद्र हा नव्हे चकोरा पारणें । फिटलें विकासित कुमोदिनी चंद्र हा न दिसे सेखीं नवलावो हे तुझी बोली रया ॥१॥ तूं चंद्रमा आर्त चकोरें आम्हीं । तृप्त झालों तुझ्या नामीं रया ॥२॥ जाणाचिया राया सुजाणा । कीं जीवाचिया जिवना । जिवलगा सोईरिया निधाना गा ऐसा ॥ तो तूं प्रकृतिपरु न कळे तुझा विचारु । साचारी वेवादती दाहीदिशा ॥ ऐसोंचि लाघव कोणा दाविसी दातारा । बोलु ठेविसी कोणा कैसा रया ॥३॥ आवडी माजी लागे हे गोडी । नाम रसनेसी सुखनिज कीर्ति हे गाढी ॥ तुझा स्वरुपतंतु लागो या मना । अंतरीच्या जीवना अगा तूंचि ॥४॥ लक्षालक्ष संभार नातुडे हा विचार म्हणोनि श्रुति नेति नेति तो तूं येकलाचि नट ना देखलासि दातारा न कळे तुझी हेचि स्थिती । म्हणौनि सांडिमांडी करुं नको मना सगुण जोडे ते करी प्रीति रया ॥५॥ यालागीं मनेंसि बोध चाळावा कीं जोडलेपणें पाहावा । कीं कोणाहि या मावा इंद्रियांचिया ॥ सकळ इंद्रियेंसी नगर कोंदलें दशदिशीं विस्तार । म्हणौनि तुझे रुप अनावर कोणें धरिजे दातार बापरखुमादेविवरा विठ्ठला धिरा उघडा । डोळा देखिजे निधान तंव मार्ग सोपा रया ॥६॥