भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तुज चुकलों गा

deva tuj chukalon ga

देवा तुज चुकलों गा । तेणें दृष्टि आलें पडळ विषयग्रंथीं गुंतलोसे । तेणें होतसे विव्हळ । अंध मंद दृष्टि झाली । गिळूं पाहे हा काळ । अवचितें दैवयोगें । निवृत्ति भेटला कृपाळ ॥१॥ धर्म जागो निवृत्तिचा । तेणें फ़ेडिलें पडळ । ज्ञानाचा निजबोधु । विज्ञानरुप सकळ ॥२॥ तिहीं लोकीं विश्वरुप । दिव्य दृष्टी दिधली । द्वैत हें हरपलें अद्वैतपणें माउली । उपदेशु निजब्रह्म । ज्ञानांजन साउली । चिद्रूप दीप पाहे । तेथें तनुमनु निवाली ॥३॥ दान हेंचि आम्हा गोड । देहीं दृष्टी मुराली । देह हें हरपलें । विदेह वृत्ति स्फ़ुरली । विज्ञान हें प्रगटलें । ज्ञेय ज्ञाता निमाली । दृश्य तें तदाकार । ममता तेथें बुडाली ॥४॥ प्रपंचु हा नाहीं जाणा । एकाकार वृत्ति जाली । मी माझे हारपलें । विषयांधया बोली । उपरती सदगुरु बोधु । तेथें प्रकृति संचली । धर्ममार्गे शुध्द पंथ हातीं काठी दिधली ॥५॥ वेद मार्गे मुनी गेले त्याच मार्गे चालिलों । न कळेचि विषयअंध म्हणोनी उघड बोलिलों । चालतां धनुर्धरा । तरंगाकारी हरलों । ज्ञानदेवो निवृत्तिचा । द्वैत निसरलों ॥६॥