भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तीसाठी केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव

bhaktisathi keli yashodesi ali | thinkoniya choli dole dev

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्तीसाठी केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥ देव गिळुनियां धरिलें मोहन । माय म्हणे कोण येथें दुजें ॥ध्रु.॥ दुजें येथें कोणी नाहीं कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥२॥ देवापाशीं पुसे देव काय झाला । हांसें आलें बोला याचें हरी ॥३॥ यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिकें मानिती साच खरें ॥४॥ लटिकें तें साच साच तें लटिके । नेणती लोभिकें आशाबद्ध ॥५॥ सांग म्हणे माय येरु वासी तोंड । तंव तें ब्रम्हांड देखे माजी ॥६॥ माजी जया चंद्र सूर्य तारांगणें । तो भक्तांकारणें बाळलीला ॥७॥ लीळा कोण जाणे याचें महिमान । जगाचें जीवन देवादिदेव ॥८॥ देव कवतुक दाखविलें तयां । लागतील पायां मायबापें ॥९॥ मायबाप म्हणे हाचि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥१०॥ तो हि त्यांचा देव दिला नारायणें । माझें हें करणें तो हि मी च ॥११॥ मीं च म्हणउनि जें जें जेथें ध्याती । तेथें मी श्रीपति भोगिता तें ॥१२॥ तें मज वेगळें मी तया निराळा । नाहीं या सकळा ब्रम्हांडांत ॥१३॥ तद्भावना तैसें भविष्य तयाचें । फळ देता साचें मी च एक ॥१४॥ मी च एक खरा बोलें नारायण । दाविलें निर्वाण निजदासां ॥१५॥ निजदासां खूण दाविली निरुती । तुका म्हणे भूतीं नारायण ॥१६॥