भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तजनां दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या

bhaktajanan dilen nijasukh deven | gopika tya bhaven alangilya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्तजनां दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥१॥ आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरीं हरी ॠणी ॥२॥ रुसलिया त्यांचें करी समाधान । करविता आपण क्रिया करी ॥३॥ क्रिया करी तुम्हां न वजे पासुनि । अवघियाजणी गोपिकांसी ॥४॥ गोपिकांसी म्हणे वैकुंठींचा पति । तुम्हीं माझ्या चित्ती सर्वभावें ॥५॥ भाव जैसा माझ्याठायीं तुम्ही धरा । तैसा चि मी खरा तुम्हांलागीं ॥६॥ तुम्हांसी कळों द्या हा माझा साच भाव । तुमचा चि जीव तुम्हां ग्वाही ॥७॥ ग्वाही तुम्हां आम्हां असे नारायण । आपुली च आण वाहातसे ॥८॥ सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभवें सरसा आणूनियां ॥९॥ यांसी बुझावितो वेगळाल्या भावें । एकीचें हें ठावें नाहीं एकी ॥१०॥ एक क्रिया नाहीं आवघियांचा भाव । पृथक ते देव घेतो तैसें ॥११॥ तैसें कळों नेदी जो मी कोठें नाहीं । अवघियांचे ठायीं जैसा तैसा ॥१२॥ जैसा मनोरथ जया चित्ती काम । तैसा मेघशाम पुरवितो ॥१३॥ पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥१४॥ गोकुळींच्या लोकां लावियेला छंद । बैसला गोविंद त्यांचा चित्ती ॥१५॥ चित्ते ही चोरूनि घेतलीं सकळा । आवडी गोपाळांवरी तयां ॥१६॥ आवडे तयांसी वैकुंठनायक । गेलीं सकळिक विसरोनि ॥१७॥ निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाहीं या देहाची शुद्धि कोणा ॥१८॥ कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव म्हणुनि तया चुंबन देती ॥१९॥ देती या टाकून भ्रतारांसी घरीं । लाज ते अंतरीं आथी च ना ॥२०॥ नाहीं कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका म्हणे वाचा काया मनें ॥२१॥