भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होइजे

baraven jhalen alon janmasi | jod jodili manushya deha aisi | maha labhachi uttam rasi | jenen sukhasi patra hoije

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होइजे ॥१॥ दिलीं इंद्रियें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥ध्रु.॥ तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥२॥ ऐसिये पावविलों ठायीं । आतां मी कांई होऊं उतराई। येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझे आई पांडुरंगे ॥३॥ फेडियेला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनि स्तनीं केलों सीतळ । निजविलों बाळ निजस्थानीं ॥४॥ नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा । आला आकारा आमुच्या चाडा । तुका म्हणे भिडा भक्तीचिया ॥५॥