भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघिया चाडा कुंठीत करूनि । लावीं आपुली च गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना

avaghiya chada kunthit karuni | lavin apuli cha godi | asha manasa trushna kalpana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघिया चाडा कुंठीत करूनि । लावीं आपुली च गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना । करूनियां देशधडी । मीतूंपणापासाव गुंतलों । मिथ्या संकल्प तो माझा तोडीं । तुझिये चरणीं माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवीं पिंडी रे रे ॥१॥ माझें साच काय केलें मृगजळे । वर्णा याती कुळ अभिमान । कुमारी भातुकें खेळती कवतुकें । काय त्यांचें साचपण ॥ध्रु.॥ वेगळाल्या भावें चित्त तडातोडी । केलों देशधडी मायाजाळें । गोत वित्त माय बाप बहिणी सुत । बंधुवर्ग माझीं बाळें । एका एक न धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळें । जाणोनियां त्याग सर्वस्वें केला। सांभाळीं आपुलें जाळें ॥२॥ एकां जवळी धरी आणिकां अंतरीं । तीं काय सोयरीं नव्हतीं माझीं । एकांचे पाळण एकांसी भांडण । चाड कवणिये काजीं । अधिक असे उणें कवण कवण्या गुणें । हे माव न कळे चि तुझी । म्हणोनि चिंतनीं राहिलों श्रीपती । तुका म्हणे भाक माझी ॥३॥